भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’ किशोरवयीन मुलांच्या तक्रारी वाढल्या (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST2021-03-13T04:53:16+5:302021-03-13T04:53:16+5:30
गोंदिया : आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू ...

भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’ किशोरवयीन मुलांच्या तक्रारी वाढल्या (डमी)
गोंदिया : आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही? आपण त्यांच्या भविष्याला घेऊन चिंताग्रस्त आहात? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर काळजीचे कारण नाही. त्या बालकांच्या शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन ‘मैत्री’ संवाद केंद्र कार्यरत झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व्यतिरिक्त जिल्हाभरातील किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांचे समाधान या ‘मैत्री’तून केले जात आहे. सन २०२० मध्ये १६५४ मुलामुलींच्या विविध तक्रारी आल्या असून त्यांचे समुपदेशन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ‘मैत्री’ संवाद केंद्रात अशा प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त मुले-मुली दाखल होतात. बालकांच्या विक्षिप्त कृत्याची तक्रार शिक्षक-पालकांकडून केली जाते. परंतु त्यात चूक त्या मुला-मुलींची नसते. वाढत्या वयासोबत त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होतात. या बदलांना सांभाळताना अनेक समस्या येतात. या समस्यांचे योग्य समाधान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते स्वत:च समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून ते चुकीच्या मार्गावरही जातात.
..........
चुकीच्या प्रदर्शनामुळे बिघडतात
किशोरवयीन मुला-मुलींच्या हातात आता स्मार्टफोन आला आहे. इंटरनेटचा सर्रास होत असलेला वापर, टी.व्ही. चॅनलवर जे दाखवायला नको ते दाखविले जाते. त्यामुळे वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न प्रौगंडावस्थेतील मुले-मुली करतात. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शाळांमध्येही या प्रकारच्या समस्या वाढत आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या प्रकरातून लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर येतात.
............
४ ठिकाणी समुपदेशन केंद्र
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १० ते १९ वर्षातील मुला-मुलींसाठी ‘मैत्री’ संवाद व सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गुरुवारी, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी व देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ही सेवा दिली जात आहे. कोरोनामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील हे केंद्र बंद आहे. किशोरवयीन बालकांच्या समस्येवर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. बालकांच्या समस्यांच्या समाधानासाठी ‘मैत्री’ संवाद केंद्राकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘मैत्री’ संवाद केंद्रात येतात. परंतु बालक आपल्या पाल्यांसामोर मनमोकळ्या पणाने बोलत नाहीत. अशावेळी त्या बालकांसोबत एकट्यात बोलले जाते. किंवा त्यांच्या समस्या कागदावर लिहून घेतल्या जातात.
...........
१६५४ मुले-मुली योग्य मार्गावर
अशा कार्यक्रमांतर्गत जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १६५४ मुला-मुलींना ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मार्गदर्शन करण्यात आले. यात ८५० किशोर व ८०४ किशोरींचा समावेश आहे. बाई गंगबाई स्त्री रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व देवरी ग्रामीण रुग्णालयात युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यात आले.
.............
अशी होते ‘मैत्री’तून जनजागृती
‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून किशोर-किशोरींना शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते. मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी करण्यात येते. विवाहपूर्व, आहारविषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता यावर उपचार केला जातो. मुलींना मासिक धर्म आजारासंदर्भात माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारासंबंधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाययोजना केली जाते. विशेष म्हणजे, हे सर्व गुप्त ठेवले जाते.
...........
लॉकडाऊननंतर कार्यक्रम नाही
‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून किशोर-किशोरींना शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती देण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम राबविण्यात आले नाही. परंतु या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. बाहेर कार्यक्रम न घेता रुग्णालयात येणाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
.......
सन २०२० मध्ये आलेल्या तक्रारींची संख्या- १६५४
मुलांच्या तक्रारी-८५०
मुलींच्या तक्रारी- ८०४