लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०२४ मध्ये सप्टेबर व ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले आहे. यासाठीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्तसुद्धा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का याची पडताळणी करून घ्यावी.
गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात धान इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला होता. तो अहवाल शासनाला पाठविण्यात आला. त्यात अतिवृष्टीमुळे १० हजार ६७४ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याने २६ कोटी २९ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. तर यामुळे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी बाधित झाले होते. यानंतर ऑक्टोबर महिन्यातसुद्धा पिकांचे नुकसान झाल्याने १३ हजार शेतकरी बाधित झाले होते. तर ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली होती. यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नव्हती. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून घेऊन रक्कम जमा झाली का याची पडताळणी करावी.
केवायसी नाही, मग अनुदान नाहीगोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे नुकसानीचे अनुदान लटकले आहे. केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणार नाही. त्यामुळे वेळेमध्ये ही प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सेतु, सीएससी किंवा महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी आपली केवायसी करून घेणे गरजेचे आहे.