दिलासा ! जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८८ %
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:05+5:302021-01-24T04:13:05+5:30
गोंदिया : बघता-बघता अवघ्या वर्षाची नासाडी करणाऱ्या कोरोनाचा अंत आता जवळ आल्याचे दिसत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्याचा ...

दिलासा ! जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८८ %
गोंदिया : बघता-बघता अवघ्या वर्षाची नासाडी करणाऱ्या कोरोनाचा अंत आता जवळ आल्याचे दिसत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८८ टक्के नोंदण्यात आला आहे. यामुळेच शुक्रवारपर्यंत (दि. २२) जिल्ह्यातील १४०८३ कोरोना बाधितांमधील १३७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसते. विशेष म्हणजे, आता जिल्ह्यात १४० क्रियाशील रुग्ण उरले असून, कोरोना नियंत्रणात असल्याने बाधितांच्या संख्येत चांगलीच घट दिसून येत आहे. म्हणजेच, जिल्ह्यातून आता कोरोना जात असल्याचे हे संकेत आहेत.
देशात कोरोना शिरल्यानंतर २५ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यानंतर आता बघता - बघता पूर्ण वर्षाची कोरोनाने नासाडी केली. कोरोनाच्या सावटात वावरतच हे वर्ष गेले व आजही देशवासी यापासून सावरलेले नाहीत. मात्र, आता कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळत असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघितल्यास शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात १४०८३ एकूण बाधितांची आकडेवारी असून, त्यातील १३७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसले. यामुळेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८८ टक्के नोंदण्यात आला आहे. आजघडीला जिल्ह्यात १४० क्रियाशील रुग्ण असून, त्यातील ६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.
विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप वाढलेला असताना दररोज तीन अंकांत येत असलेला कोरोना बाधितांचा आकडा आता घसरून एक अंकावर आल्याचे दिसत आहे. म्हणजेच, कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीही खबरदारी घेेणे गरजेचे असून, यातूनच कोरोनावर मात करता येणार यात शंका नाही.
---------------------------
देश व राज्यापेक्षा चांगली स्थिती
शुक्रवारी देशाचा रिकव्हरी रेट ९६.६० टक्के, तर राज्याचा रिकव्हरी रेट ९४.८३ टक्के नोंदण्यात आला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८८ टक्के नोंदण्यात आला आहे. म्हणजेच, देश व राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती चांगली दिसून येत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी आतापर्यंत जिल्ह्यातील १८१ रुग्णांचा जीव कोरोनाने घेतला. ही बाब मात्र मनाला चटका लावून जाणार आहे.
---------------------------
३ शस्त्रांचा वापर गरजेचा
कोरोनाशी लढण्यासाठी तोंडावर मास्क, हातात सॅनिटायझर व शारीरिक अंतराचे पालन ही ३ शस्त्र माणसाकडे असून, याचाच अवलंब करून आज कोरोनावर मात करता येत आहे. आता लस आली असली तरी या शस्त्रांकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगितले जात आहे. जिल्ह्यातून कोरोना जात आहे, पूर्णपणे गेला नसल्याने या ३ शस्त्रांचा वापर करणे आजही गरजेचे आहे.