व्यापारातील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढे यावे
By Admin | Updated: May 31, 2014 23:34 IST2014-05-31T23:34:46+5:302014-05-31T23:34:46+5:30
व्यापारी शहर असणार्या गोंदियात ग्राहकांची विविध प्रकारे लुबाडणूक होऊ शकते. व्यापारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी ग्राहकांनी जागरूक होऊन पुढे आले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ग्राहक

व्यापारातील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढे यावे
ग्राहकांना आवाहन : पंचायतचे अध्यक्ष आळशी यांनी लावली प्रकरणे मार्गी
गोंदिया : व्यापारी शहर असणार्या गोंदियात ग्राहकांची विविध प्रकारे लुबाडणूक होऊ शकते. व्यापारातील गैरप्रकार थांबविण्यासाठी ग्राहकांनी जागरूक होऊन पुढे आले आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ग्राहक मंच सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी दिली.
‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी व्यापारातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून गोंदिया जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचला स्थायी अध्यक्ष नसल्यामुळे मंचचा कारभार ढेपाळला होता. त्यामुळे अन्याय झाल्याचे लक्षात येऊनही अनेक ग्राहक मंचकडे तक्रार देण्यास धजावत नव्हते. मात्र गेल्या २८ जानेवारी २0१४ रोजी मंचचे अध्यक्ष म्हणून अतुल आळशी यांनी कार्यभार स्वीकारला आणि जिल्हा ग्राहक मंचला पुनरूज्जीवित केले. त्यांच्याकडे भंडारा जिल्हा ग्राहक मंचचाही कार्यभार असल्यामुळे दि.१५ ते ३0 असे १५ दिवसच ते गोंदियात उपलब्ध असतात. अर्थात गेल्या प्रत्यक्ष कामाचे दिवस विचारात घेतल्यास अवघ्या २ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी प्रलंबित असलेली २५ प्रकरणे निकाली काढली. याशिवाय ३0 नवीन प्रकरणे दाखल करून घेतली. या बहुतांश प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्या ग्राहकांना योग्य न्याय मिळाला आहे.
अत्यंत माफक खर्चात (२00 ते ५00) आणि जास्तीत जास्त ६ ते ७ महिन्यात प्रकरणांचा निपटारा केल्या जात असल्यामुळे कोणत्याही ग्राहकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच प्रकरण दाखल करणे कधीही परवडणारे असते. फक्त ग्राहकाने एखादी वस्तू किंवा सेवा घेतल्याचा पुरावा तेवढा जवळ बाळगणे गरजेचे आहे. मात्र इतर न्यायालयांसारखा किचकट पुरावा नसला तरी ग्राहकाच्या बाजुने निकाल लागू शकतो, असे न्या.आळशी यांनी सांगितले.
पैसे देऊन घेतलेली कोणतीही सेवा ही ग्राहक मंचच्या कक्षेत येते. गोंदिया जिल्ह्यात शेतकर्यांच्या अपघात विम्याची प्रकरणे बरीच आली. त्यापैकी ९५ टक्के प्रकरणांमध्ये शेतकर्यांच्या कुटुंबियांच्या बाजुने न्यायनिवाडा झाला. याशिवाय वीज वितरण कंपनी, खासगी विमा कंपन्या, एलआयसी, जनरल इन्शुरन्स कंपन्या, एवढेच नाही तर डॉक्टरांच्या विरूद्धच्याही केसेस जिल्हा ग्राहक मंचाकडे आल्या आहेत.
खासगी विमा कंपन्या सुरूवातीला ग्राहकांना प्रलोभन दाखवत असल्या तरी प्रत्यक्ष मदत देताना अनेक पळवाटा काढत पैसे देण्याचे टाळतात. परंतू ग्राहक मंचाने त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केल्याचे न्या.आळशी यांनी सांगितले.
ग्राहकांमध्ये आपल्या हक्काविषयी जागृती आणण्यासाठी मंच वेळोवेळी अधिवेशन घेत असते. ग्राहकाला कायदेशिर संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करते. अनुचित प्रकार घडल्यापासून २ वर्षाच्या आत ग्राहकाला मंचाकडे तक्रार दाखल करता येते. परंतू एखाद्या वेळी विलंब झाला आणि त्याचे कारण संयुक्तिक असेल तर ते प्रकरण आम्ही दाखल करून घेतो, असेही अध्यक्ष अतुल आळशी यांनी सांगितले.
(जिल्हा प्रतिनिधी)