जिल्हाधिकाऱ्यांकडूनही हजेरी सहायकांची उपेक्षाच
By Admin | Updated: June 28, 2014 01:09 IST2014-06-28T01:09:23+5:302014-06-28T01:09:23+5:30
जिल्ह्यात १७ हजेरी सहायक कार्यरत आहेत. त्या विभागात रोहयोचे कामे नसल्याने १ जून २०१४ पासून क्षेत्रीय जिल्हास्तरावरील ...

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही हजेरी सहायकांची उपेक्षाच
काचेवानी : जिल्ह्यात १७ हजेरी सहायक कार्यरत आहेत. त्या विभागात रोहयोचे कामे नसल्याने १ जून २०१४ पासून क्षेत्रीय जिल्हास्तरावरील रोहयो प्रभागांतर्गत रोहयो कक्षामध्ये काम देण्याचे शासनाने निर्देश दिल्याने जिल्हाधिकारी (मग्रारोहयो) यांनी कार्यवाही केली. मात्र यात पक्षपात व शिफारशीद्वारे अन्याय करण्यात आल्याचे आरोप हजेरी सहायकांनी केला आहे.
हजेरी सहायकांना परवडत नसले तरी शासनाकडून आज ना उद्या न्याय मिळेल या आशेने पदावर राहून त्यांनी काम सोडले नाही. परंतु शासन व प्रशासनानेच त्यांची उपेक्षा केली. २१ वर्षांपासून लढा देत निम्यापेक्षा अधिक सेवानिवृत्त झाले. जे उरले आहेत तेसुद्धा सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी प्रभागांतर्गत रोहयो कक्षामध्ये काम देण्याचे आदेश देताना त्यांच्या अडचणी व वयोमर्यादेकडे मुद्दाम लक्ष दिले नाही, असा आरोप हजेरी सेवकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गोंदिया तालुक्याच्या पांढराबोडी येथील रहिवाशी कोमल दमाहे (५९) यांचे वेतन पाच हजार ९०० रूपये असून त्यांना सेवानिवृत्त व्हायला फक्त एक वर्ष उरला आहे. त्यांना पंचायत समिती देवरीच्या मग्रारोहयो कक्षात कामावार जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा येथील रहिवाशी रामेश्वर भांडारकर (५९) यांना पंचायत समिती सालेकसा येथील मग्रारोहयो कक्षात काम देण्यात आले आहे. त्यांचा एकूण पगार सहा हजार ९५० रुपये असून सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी आहे. गोंदियातील रहिवाशी मेश्राम (५९ वर्षे ९ महिने) त्यांना पंचायत समिती सडक/अर्जुनी येथील मग्रारोहयो कक्षात कामावर पाठविण्यात आले आहे. यांच्या सेवानिवृत्तीला केवळ तीन महिने उरले आहेत.
दिलेल्या आदेशावरुन ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अर्थात ज्यांची ओळख आणि शिफारस त्यांना सुविधाजनक प्रभागातील कक्षात काम देण्यात आले आहे. परंतु ज्यांचा कोणीही वाली नाही, अशा हजेरी सहायकांना वयोमानाचा विचार न करता दूरवर असलेल्या प्रभागात पाठविण्यात आले आहे. असा आरोप हजेरी सहायकांच्या कुटुंबीयांनी केला असून नावे जाहीर न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले आहे.
गावाजवळ शेतात किंवा माती-गोट्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुराला २०० ते ३०० मजुरी दिली जाते. त्यांच्या महिन्याच्या पगाराचा विचार केला तर ६ ते १० हजार रुपये पडतो. परंतु हजेरी सहायकांचा पगार ५ हजार ९०० पासून ७ हजार रुपये पडतो. हा मोठाच अन्याय आहे. त्यातच हजेरी सहायकांचा अंतरावर रोहयोच्या कक्षात आदेश दिल्याने त्यांची मानसिकता कशी असेल किंवा राहील याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही, अशीही टिका हजेरी सहायकांच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)