थंडी व पावसात चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:07+5:30
मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते.

थंडी व पावसात चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २६ डिसेंबरपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसू लागला आहे. परिणामी थंडीचा जोर वाढला असून पारा ५ अंशांवर पोहोचला होता. बोचऱ्या थंडीमुळे सर्वांचेच हाल होत असतानाही चिमुकल्यांना शाळेत जावे लागत आहे. मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळांना प्रशासनाकडून सुटी देण्यात आली नाही. परिणामी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत थंडी व अवकाळी पाऊस बघता शाळांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते. असे असतानाही मात्र जिल्ह्यातील शाळांकडून वातावरण बघता सुटी जाहीर करण्यात आली नाही. परिणामी सकाळी उठून चिमुकल्यांना शाळेची धाव घ्यावी लागत आहे.
इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता आजचे हे वातावरण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मात्र शाळांना सुटी नसल्याने माय-बाय त्यांना शाळेत धाडत आहेत. अगोदरच थंडी आहे, त्यात पाऊस अधिकच भर घालत असल्याने हात-पाय गारठत आहेत. या वातावरणाला बघता भलेभले घराबाहेर निघणे टाळत असून घरातही गरम कपड्यांत दडून बसत आहेत. असे असताना मात्र शाळा संचालक व जिल्हा प्रशासनाला चिमुकल्यांच्या आरोग्याशी कसलेच घेणे-देणे नसल्याचे दिसत आहे.
वातावरण बघता शाळांना काही दिवस सुटी जाहीर करावी अशी मागणी पालकांसह सुज्ञ नागरिक करीत आहेत.विशेष म्हणजे, जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देत निर्णय घेण्याची गरज आहे.
वज्रघात, गारपीट व पावसाचा इशारा
हवामान खात्याकडून मागील आठ दिवसांपासून पाऊस, वीज व गारपीटीचा इशारा दिला जात आहे. त्यानुसार, शुक्रवारीही (दि.३) वज्रघात, गारपीट व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने चिमुकल्यांचे आरोग्य व त्यांनी सुरक्षा लक्षात घेता सुटी जाहीर करण्याची गरज आहे. खासगी शाळांकडून स्वमर्जीने सुटी जाहीर केली जाणार नाहीच. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून काय तो निर्णय त्वरीत घेण्याची गरज आहे.