स्वच्छता हीच आरोग्याची संजीवनी
By Admin | Updated: January 1, 2015 23:03 IST2015-01-01T23:03:58+5:302015-01-01T23:03:58+5:30
आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे समाजात नवनवीन आजारांची लागण होते. आजाराचे मूळ कारण अस्वच्छता आहे.

स्वच्छता हीच आरोग्याची संजीवनी
अरविंद शिवणकर : स्वच्छ ग्राम मेळावा
बोंडगावदेवी : आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे समाजात नवनवीन आजारांची लागण होते. आजाराचे मूळ कारण अस्वच्छता आहे. गावात आरोग्य सुदृढ नांदून रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे यावे. स्वच्छता ही आरोग्याची संजीवनी आहे, असे मत जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अर्जुनी/मोरगावच्या वतीने पिंपळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये ग्राम स्वच्छता मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पं.स. चे उपसभापती पोमेश्वर रामटेके, पं.स. सदस्य अल्का बांबोळे, सरपंच, खंडविकास अधिकारी जी.डी. कोरडे, सहायक खंड विकास अधिकारी सुनील तडस मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी आपल्या बोंडगावदेवी जि.प. प्रभागातून पिंपळगाव दत्तक घेतले आहे. याप्रसंगी उपस्थितांना स्वच्छ भारत अभियान मेळाव्यासंदर्भात आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, प्रत्येकाने स्वत:च्या घरासमोर स्वच्छता केली तर रस्त्यावर घाण-कचरा राहणार नाही.
एक सामाजिक बांधिलकी समजून ग्रामस्थांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्याचे मानस अंगिकारावे. गावात स्वच्छतेचे दृश्य निर्माण झाल्यास निश्चितच गाव समृध्द होऊन विकासाच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बोंडगावदेवी जि.प. प्रभागातून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत पिंपळगाव संपूर्ण स्वच्छ करण्याकरिता दत्तक घेत असल्याचे शिवणकर यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनमध्ये गावकऱ्यांनी गाव स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
मेळाव्याचे संचालन पं.स. चे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) राजू वलथरे यांनी केले. मेळाव्याला पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)