ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला शेतकरी अपघात विमा दावा
By Admin | Updated: December 24, 2014 23:02 IST2014-12-24T23:02:03+5:302014-12-24T23:02:03+5:30
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या पत्नीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे केलेला दावा वर्ष लोटूनही मंजूर-नामंजूर सदर कंपनीने कळविले नव्हते. त्यामुळे तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला शेतकरी अपघात विमा दावा
गोंदिया : शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या पत्नीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे केलेला दावा वर्ष लोटूनही मंजूर-नामंजूर सदर कंपनीने कळविले नव्हते. त्यामुळे तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायमंचाने विमा दाव्याचे एक लाख रूपये नुकसान भरपाईसह मृत शेतकऱ्याच्या पत्नीला द्यावे, असा आदेश न्यू इंडिया विमा कंपनीला दिला आहे.
जीरा टीकाराम उके रा. नवेगाव (खु), ता. तिरोडा, जि. गोंदिया असे तक्रारकर्त्या शेतकरी पत्नीचे नाव आहे. तिचे पती टीकाराम सिताराम उके यांना १९ डिसेंबर २०१२ रोजी एका अज्ञात वाहनाने नवेगाव फाट्याजवळ धडक दिली होती. त्यात ते जागीच गतप्राण झाले. त्यांच्या नावे नवेगाव खु. येथे सर्व्हे-४१९ या वर्णनाची शेती असून त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला होता. त्यामुळे जीरा उके यांनी ६ एप्रिल २०१३ रोजी विमा दावा मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज केला होता.
मात्र सदर विमा कंपनीने एक वर्षापासून कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाले. वर्षभरापासून मंजूर-नामंजूर कोणताही निर्णय न घेतल्याने विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीबाबत, विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्याबाबत ग्राहक न्यायमंचात ७ जून २०१४ रोजी तक्रार दाखल केली. यानंतर न्यायमंचाने विमा कंपनीला नोटीस पाठविले. त्यांचे लेखी जबाब त्यांचे वकील अॅड. इंदिरा बघेले यांनी ८ सप्टेंबर २०१४ रोजी नोंदविले. त्यात माहितीचा अभाव व तक्रारकर्तीचे पती शेतकरी नसून विमा दाव्यास पात्र नाहीत, तसेच पत्रान्वये मागितलेली माहिती मुदतीत न पुरविल्याने दावा प्रलंबित असल्याचे नमूद केले.
तक्रारकर्ती जीरा उके यांनी शेतकरी अपघात विम्याचा शासन निर्णय, सातबाराचा उतारा, फेरफार नोंदणी, वारसा प्रकरणाची नोंद नमूणा, घटनास्थळ पंचनामा, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, मरणान्वेषण प्रतिवृत्त, तिरोडा पोलीस निरीक्षकांचे मृत्यूच्या कारणाचे अहवाल आदी सर्व कागदपत्रे सादर केली होती.
शिवाय जीरा उके यांचे वकील अॅड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, सदर शेतकऱ्याचा मृत्यू १९ डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला होता. ते शेतकरी होते व कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. त्यांच्या पत्नीने सातबाराचा उतारा व फेरफार नकल जोडली असून त्या विम्याचा लाभ घेण्यास पात्र आहेत. शिवाय सदर विमा कंपनीने वर्ष लोटूनही दावा मंजूर किंवा नामंजूर असे न कळविल्याने सदर दावा मुदतीत आहे. तसेच न कळविणे ही सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे वारसदार म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा त्यांनी युक्तिवाद केला.
यावर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने कारणमिमांसा केली व मृत शेतकऱ्याची पत्नी तक्रारकर्ती जीरा उके यांची तक्रार अंशत: मान्य केली. त्यानुसार त्यांना मृतक पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये शेतकऱ्याच्या मृत्यू दिनांकापासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे; तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून जीरा उके यांना १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश न्यायमंचाने न्यू इंडिया विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)