काँंग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांची दावेदारी
By Admin | Updated: July 15, 2014 00:01 IST2014-07-15T00:01:54+5:302014-07-15T00:01:54+5:30
तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन इच्छुकांच्या भेटी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीवरून आलेले निरीक्षक ईश्वरचंद शुक्ला सोमवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

काँंग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांची दावेदारी
गोंदिया : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन इच्छुकांच्या भेटी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीवरून आलेले निरीक्षक ईश्वरचंद शुक्ला सोमवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या भेटी त्यांनी गोंदियाच्या विश्राम भवनावर घेऊन त्यांची चाचपणी केली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची संख्या कमी नसल्याचे विश्राम भवनातील गर्दीवरून दिसून आले. पक्षात सक्रिय असलेल्यांपासून तर कधीतरी पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी उत्तर प्रदेशातील माजी आमदार असलेले काँग्रेसचे निरीक्षक शुक्ला यांच्याकडे आपला फॉर्म भरून देऊन चर्चा केली. मात्र तिरोडा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असल्यामुळे तेथून इच्छुकांची संख्या कमी होती.
सर्वाधिक इच्छुकांची संख्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात दिसली. या मतदार संघातील गतवेळचे पराभूत उमेदवार रामलाल राऊत, माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे, युवा उमेदवार रत्नदीप दहीवले यांच्यासह अनेकांनी या मतदार संघासाठी दावेदारी केली. देवरी मतदार संघातूनही काही नवीन उमेदवार इच्छुक दिसले. मात्र गोंदिया मतदार संघात लढण्यासाठी कोणी फारसे उत्सुक दिसले नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)