नगर परिषदेक डे डासनाशक औषधच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:50 IST2018-09-28T23:49:36+5:302018-09-28T23:50:42+5:30
शहरात विविध प्रकारचे डास व किटकजन्य आजार पसरत असतानाच यावर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक औषध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी किती तत्परतेने काम करीत आहेत याची प्रचिती येते.

नगर परिषदेक डे डासनाशक औषधच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात विविध प्रकारचे डास व किटकजन्य आजार पसरत असतानाच यावर नियंत्रणासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक औषध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी किती तत्परतेने काम करीत आहेत याची प्रचिती येते.
नगर परिषद स्वच्छता विभागाकडून औषध खरेदी करू असे आश्चर्यजनक उत्तर मिळाले. अशात मात्र शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात स्क्रब टायफस, डेंग्यू व स्वाईन फ्लू पाय पसरत आहे. डेंग्यूचे रूग्ण शहरात आढळत असतानाच स्क्रब टायफसने बुधवारी शहरातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला. डास व किटकजन्य आजारांची सध्या साथच पसरत असल्याने शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी शहरात डासनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.हिवताप नियंत्रण विभागाकडून यासाठी ग्रामीण भागात किटकनाशक फवारणी केली जाते. मात्र गोंदिया शहर नगर परिषद क्षेत्रात असल्याने शहरात किटकजन्य आजारांवर प्रतिबंधक मोहीेम राबविण्याची जबाबादारी नगर परिषदेची आहे. मात्र नगर परिषद आपली जबाबदारी वहन करण्यात असमर्थ दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेकडे किटकनाशक फवारणीसाठी कुठलेच औषधच नाही. नगर परिषदेने ३० जूनला हिवताप विभागाकडून ३० लिटर बीटीआय द्रव्य आणले होते. त्याच्या भरोश्यावर नगर परिषदेने आतापर्यंत शहरात फवारणी केली.
मात्र ते औषधही २६ सप्टेंबर रोजी संपल्याची माहिती आहे. म्हणजेच, आता आजारांचा उद्रेक वाढत असताना त्याला प्रतिबंध लावण्यासाठी नगर परिषदेकडे औषधच उपलब्ध नाही.
यावरून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत चालत आहे याची प्रचिती येते. अधिकारी व कर्मचारी आपले खापर दुसºयावर फोडून हात झटकण्याचे प्रकारही बघावयास मिळत आहे.
औषधांची थेट खरेदी नगर परिषदेकडून
आतापर्यंत वर्षभरासाठी लागणाºया औषधांची निविदा काढून खरेदी केली जात होती. मात्र आता ही पद्धत संपुष्टात आल्याचे दिसत आहे. शिवाय आता पुरवठाधारकही निविदांमध्ये रूची घेत नसल्याचेही चित्र आहे. कारण, नगर परिषदेने औषध खरेदीसाठी एप्रिल, मे व जून महिन्यात निविदा काढली होती. त्यात एप्रिल महिन्यात, मे महिन्यात एक व जून महिन्यातील दोन निविदांत दोनच पुरवठादारांनी निविदा टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे आता थेट औषध खरेदी करून काम भागविण्याचे काम नगर परिषद स्वच्छता विभागाकडून केले जात आहे. त्यातही किटकनाशक द्रव्यासाठी नगर परिषद हिवताप विभागाच्या भरवशावर अवलंबून राहत असल्याचेही दिसते. तेथून द्रव्य आणून नगर परिषद आपले काम काढत आहे.
स्वच्छता विभागाचा कारभार संशयास्पद
नगर परिषद स्वच्छता विभागाकडून नियमीत फवारणी केली जात असल्याचे सांगीतले जाते. यासाठी १२ कंत्राटी तत्वावर मजूर घेण्यात आली आहेत. एका प्रभागात दोन मजूर पाठवून फवारणी केली जात असल्याचे सांगीतले जाते. एप्रिल महिन्यापासून फवारणी सुरू असल्याचे सांगीतले जात असतानाच, एवढ्या नियमीतपणे फवारणी होत असताना शहरात आजारांचा जोर वाढणे आश्चर्यजनक व तेवढीच धक्कादायक बाब आहे. सातत्याने फवारणी झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात डास व किटकांची उत्पत्ती होत असल्याने फवारणीला घेऊन संशय येतो. यात एकतर फवारणीसाठी वापरले जाणारे द्रव्य योग्य नाही किंवा फवारणी योग्य रित्या होत नाही हे मात्र नक्की.