कोरोनाबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:30+5:30
आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मीना यांनी, कोरोना हा संसर्ग आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे अशी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तपासणीला उशीर करु नका, कोरोनाला घाबरु नका, आजार लपवू नका व ताप अंगावर काढू नका, तपासणीसाठी पुढे या असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करा व संभाव्य धोक्यापासून स्वत:ला दूर ठेवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (दि.१४) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मीना यांनी, कोरोना हा संसर्ग आजार असून ताप, खोकला, घसा खवखव करणे अशी लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तपासणीला उशीर करु नका, कोरोनाला घाबरु नका, आजार लपवू नका व ताप अंगावर काढू नका, तपासणीसाठी पुढे या असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे असताना सुद्धा नागरिक तपासणीसाठी पुढे येण्यास टाळाटाळ करतात, ही बाब आरोग्यासाठी योग्य नाही. तपासणीला उशीर केल्यास आजार बळावतो. विशेषत: ५० वर्षावरील व्यक्तीसाठी धोका अधिक वाढतो. जिल्ह्यात कोरोना आटोक्यात ठेवण्यासोबतच मृत्यू संख्या कमी करण्यावर प्रशासनाचा भर असून यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मीना यांनी, नगरपरिषद क्षेत्रात एकूण ८ स्वॅब तपासणी केंद्र सुरु करण्यात आले असून नागरिकांनी मनात भीती न बाळगता आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन संभाव्य धोका टाळता येऊ शकेल. आपल्या कुटुंबात तसेच परिचयातील कुठल्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीतजास्त आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांची क्षमता आहे त्यांचेच होम आयसोलेशन करावे. होम आयसोलेशन रुग्णांकडे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जावून त्यांची आस्थेने विचारपूस करावी, जेणेकरुन बाधित रुग्णांचे धैर्य वाढण्यास मदत होईल असे सांगीतले.
आशा सेविकांजवळ पल्स ऑक्सीमीटर, टेम्परेचर व थर्मल गन देणे आवश्यक आहे. सर्व्हे करण्याचा उद्देश काय आहे तसेच स्वॅब करण्याची पद्धत, एका दिवसात किती स्वॅब घेतले जातात याबाबत त्यांनी विचारणा केली. शहरात जिकडे-तिकडे अस्वछता दिसत आहे. रस्ते स्वच्छ झाले पाहिजे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेने योग्य ते नियोजन करावे. शहर अस्वच्छ राहणार नाही याकरीता कचरा फेकण्यासाठी नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, रुग्णांमध्ये कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे कोरोनाबाबत समुपदेशन करुन त्यांचे समाधान केले पाहिजे, त्यांना दिलासा दिला पाहिजे असे सांगितले. माजी आमदार जैन यांनी, आरोग्य विभागाने बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष न करता त्यांची सकारात्मक दृष्टीकोनातून सेवा केली पाहिजे. कोविड केअर सेंटरमध्ये योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे असे सांगितले.
बाहेर फिरणाऱ्या रूग्णांवर गुन्हा दाखल करा
जिल्ह्यात कित्येक रूग्ण आयसोलेट न होता बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडे लक्ष देत मीना यांनी, पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. जे होम आयसोलेशन रुग्ण ऐकत नसतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले.