सरपंच-उपसरपंच निवडीत चुरस
By Admin | Updated: August 8, 2015 02:00 IST2015-08-08T02:00:55+5:302015-08-08T02:00:55+5:30
अनेक ठिकाणी महिलांना संधी : ग्रामीण भागात ‘नवा गडी नवा राज’

सरपंच-उपसरपंच निवडीत चुरस
गोंदिया : जिल्हाभरात अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यानंतर सरपंच-उपसरपंच पदांची निवडही टप्प्याटप्प्याने सुरू असून अनेक ठिकाणी यात चुरस दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळत आहे.
११ ग्रामपंचायतवर भाजपचा कब्जा
गोंदिया : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता काबिज केली आहे. बलमाटोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वनिता शहारे व उपसरपंचपदी अनिल डोंगरे, रावणवाडी येथे सरपंच सुजित येवले व उपसरपंच कैलाश कुंजाम, कोरणी येथे सरपंच संगीता तुरकर व उपसरपंच छन्नू बिसेन, बघोली येथे सरपंच ज्ञानेश्वरी चौधरी व उपसरपंच सुरेंद्र सोनवाने, मोगर्रा येथे सरपंच दुर्गेश्वरी कुसराम व उपसरपंच दिलीपसिंग मुंडेले, परसवाडा ग्रामपंचायत, नवेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील सुलाखे व उपसरपंच राजकुमार सुलाखे, लोधीटोला-धापेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद बघेले व उपसरपंच कल्पना लिल्हारे, भानपूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लिल्हारे व उपसरपंच छगनलाल चौरीवार, गंगाझरी ग्रामपंचायतीचे सरपंच ममता लिल्हारे व उपसरपंच मंगेश मरस्कोल्हे आणि घिवारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू कटरे व उपसरपंचपदी सुनीता नागपुरे यांची निवड करण्यात आली. तसेच लोधीटोला-चुटिया ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजराम पगरवार यांची निवड झाली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
पिंडकेपार ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा झेंडा
तिरोडा/सुकडी (डाकराम) : : पिंडकेपार ग्रा.पं.च्या सरपंच पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना गणेश शिंपी तर उपसरपंचपदी प्रतिभा तानसेन शेंडे यांची निवड करण्यात आली. ग्रा.पं. सदस्य शालिकराम भेलावे, ताराचंद बहेरे, अन्नपूर्णा उईके यांनी सहकार्य केले. माजी आ. दिलीप बंसोड यांच्यासह जगन धुर्वे, माजी सरपंच भेलावे, बंडू मरस्कोल्हे, डिलेश मेश्राम, युवराज चौधरी, हितेंद्र बावणे, मुन्ना पटले यांचे मार्गदर्शन लाभले.
पिंडकेपार ग्रामपंचायतची एकूण सात सदस्य संख्या आहे. यात सहा सदस्य निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर एक सदस्य अविरोध निवडून आला. सरपंच पद अनुसूचित जातीच्या महिलेसाखी राखीव होते. सरपंच पदासाठी कल्पना गणेश शिंपी व गोपिका टेंभेकर यांनी अर्ज केले होते. तर उपसरपंच पदासाठी शालिकराम भेलावे, प्रतिमा शेंडे, भागवत कटरे यांनी अर्ज केले. यापैकी शालिकराम भेलावे यांनी अर्ज मागे घेतले. यानंतर सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात आली. यात कल्पना शिंपी यांना पाच मते पडली तर गोपिका टेंभेकर यांना दोन मते पडले. प्रतिमा शेंडे यांना पाच मते तर भागवत कटरे यांना दोन मते मिळाली. त्यामुळे सरपंच कल्पना शिंपी व उपसरपंच प्रतिमा शेंडे अशी निवड झाली. निवडणूक अधिकारी कोटांगले, तलाठी क्षीरसागर, ग्रामसेवक सोनवाने व सर्व गावकरी उपस्थित होते.
बोपेसर-खोडगाव येथे चुरशीची लढत
वडेगाव : बोपेसर-खोडगाव येथे सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली. सदर निवडणूक ग्रामपंचायत बोपेसरच्या सभागृहात पार पडली. यात सरपंचपदी खोडगावचे छत्रपती लखन नागपुरे तर उपसरपंचपदी बोपेसर येथील तिरूपती हेमराज राणे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस. आंबेडारे, ग्रामसेवक एस.एस. वरठे व तलाठी वाकलकर उपस्थित होते.
सरपंचपदी झोडे, उपसरपंचपदी मानकर
बोंडगावदेवी : येथे सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित राधेश्याम झोडे यांची सरपंचपदी तर वैशाली रेवाराम मानकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी भाजप समर्थित पॅनलचे राधेश्याम झोडे व ग्राम विकास पॅनलचे दिनेश फुल्लुके, तसेच उपसरपंच पदासाठी भाजप समर्थित पॅनलच्या वैशाली रेवाराम मानकर व ग्राम विकास पॅनलचे साधू मेश्राम यांच्या सरळ लढत झाली. यात सात-चार अशा फरकाने सरपंचपदी राधेश्याम झोडे व उपसरपंचपदी वैशाली मानकर विजयी झाल्या. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार गावड यांनी काम पाहिले. ग्रामसेवक ब्राह्मणकर यांनी काम पाहिले.
अंजोरा ग्रा.पं.मध्ये भाजपाराज कायम
साखरीटोला : अंजोरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपचे पाच व राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले. सरपंच-उपसरपंच पदांची निवड आमगाव तालुक्याचे कृषी विस्तार अधिकारी येडे यांच्या देखरेखीत पार पडली. सरपंच पदासाठी भाजपच्या सुनिता सुभाष तुरकर व राकाँच्या निर्मला युवराज रहांगडाले यांनी अर्ज केले. सरपंच पद नामप्र महिलेसाठी राखीव असल्याने चांगलीच रंगत वाढली. यात सुनिता तुरकर यांना पाच तर निर्मला रहांगडाले यांना चार मते मिळाली. त्यामुळे सरपंचपद भाजपकडे गेले व सुनिता तुरकर सरपंच झाल्या. उपसरपंच पदाकरिता भाजपचे देवेंद्र अंबुले व राष्ट्रवादीचे गजानन भांडारकर यांनी अर्ज केले होते. यात देवेंद्र अंबुले यांना पाच तर गजानन भांडारकर यांना चार मते मिळाली. त्यामुळे देवेंद्र अंबुले यांची उपसरपंचपदी निवड झाली.
गात्रा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा
दासगाव : गात्रा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित उमेदवार बहुमताने विजयी झाले. यात सरपंचपदी डिलेश्वरी येडे व उपसरपंच पदी सोना बोपचे यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये पुण्यशील बरडे, गोधन खांडवाहे, रमेश चव्हाण, अतुल नंदेश्वर, महेंद्र काटेवार, धनवेता पटले, निर्मला ठाकरे, वेणू गावड यांचा समावेश आहे. माजी पं.स. सदस्य गणेश बरडे यांच्या पॅनलने ग्रा.पं.वर वर्चस्व प्राप्त केले आहे.
बोदलकसा ग्रा.पं.वर काँग्रेसचा झेंडा
सुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा ग्रामपंचायतवर राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता स्थापित झाली आहे. बोदलकसा, रूस्तमपूर व बुचाटोला ही तिन्ही गावे मिळून बोदलकसा ग्रामपंचायत स्थापन झाली. यात सात सदस्य संख्या आहे. त्यात बोदलकसामधून दोन सदस्य, रूस्तमपूरमधून दोन सदस्य व बुचाटोलामधून तीन सदस्य निवडायचे होते.
यात कॉंग्रेसचे पाच सदस्य अविरोध निवडून आले. तर एका सदस्याची निवडणूक झाली व एका सदस्याची जागा रिक्त आहे. असे एकूण सहा सदस्य असून सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभा ताराचंद जांभूळकर यांनी सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या चैतलाल चंदन पटले यांनी अर्ज सादर केले. त्यांच्याविरूद्ध कुणीही अर्ज केला नसल्यामुळे सरपंच व उपसरपंच पदावर त्यांची अविरोध निवड झाली. या वेळी निवडणूक अधिकारी यू.एस. निखाल, ग्रा.पं.चे नवनिर्वाचित सदस्य भाऊराव साखरे, प्रेमलता पाटील, माया पंधरे, ग्रामसेवक सुनील शहारे व गावकरी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)