छेडखानीचा गुन्हा पाठविला तडजोडीसाठी
By Admin | Updated: August 24, 2015 01:44 IST2015-08-24T01:44:46+5:302015-08-24T01:44:46+5:30
तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे.

छेडखानीचा गुन्हा पाठविला तडजोडीसाठी
सालेकसा पोलिसांवर प्रश्नचिन्ह : आरोपी तंटामुक्त अध्यक्षाकडेच प्रकरण तडजोडीसाठी
गोंदिया : तरूणीला जाळून विहिरीत टाकण्यात आल्याचे देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील समाजमन सुन्न करणारे प्रकरण सध्या गाजत आहे. छेडखानीच्या प्रकरणाने वाढून हे रूप घेतल्याचे वास्तव आता पुढे येत आहे. छेडखानीसारख्या गंभीर गुन्ह्याला तंटामुक्त समितीकडे तडजोडीसाठी पाठविण्यात आल्याने ही घटना घडून एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे.
गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी सन २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राज्यशासनाने अंमलात आणली. अनेक गावात उदभवणाऱ्या वादावर नियंत्रण या तंटामुक्त मोहीमेने आणले. परंतु गंभीर गुन्हे तंटामुक्त समितीला सोडवता येणार नाही ते गुन्हे न्यायालयातच चालतील असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असतानाही सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या गंभीर गुन्ह्यात तक्रार नोंदवून न घेता तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडवून घेण्याचा सल्ला दिला.
तंटामुक्त समितीला अदखलपात्र व क्षुल्लक वाद आपसी समझोत्यातून सोडविण्यास शासनाने संमती दिली. मात्र सालेकसा पोलिसांनी छेडखानीच्या या गंभीर गुन्ह्याला क्षुल्लक समजून ज्याने छेड काढली त्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकडेच ते प्रकरण तडजोडीसाठी पाठविले. ज्याच्यावर छेडखानीचा आरोप आहे त्याच्याच समितीत ते प्रकरण तडजोड करताना तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा.
आता काही करणार नाही, तिला काही झाल्यास मी जबाबदार राहील असे शंभर रूपयाच्या मुद्रांकावर त्याने लिहून दिले. परंतु प्रकरण तडजोड झाल्यानंतरही कुणी माझे काय बिघडवले असा ओरडत तो आरोपी गावात फिरत असे, असे मुलीचे मामा अनिल वानखेडे म्हणतात.
पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंदवून कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र हलगर्जीपणा करण्यात आला व त्या निष्पाप तरूणीचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद का केली?
आरती बारसे हिला जाळून तिचा मृतदेह विहिरीत टाकला गेला. सुरूवातीला पोलिसांना साक्षीदार मिळाले नसावे मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा खून असल्याचे सहज कळू शकत होते. आरोपी कोण व घटना कशी झाली या नंतरच्या बाबी होत्या. परंतु जळालेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळतो, ओढणी टेबलावर असते, रॉकेलची डबकी तिथेच पडून होती. असे अनेक पुरावे तेथेच होते तर पोलिसांनी त्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद का? असे बोलले जात आहे.