आयसीआयसीआय विमा कंपनीला ग्राहक मंचची चपराक
By Admin | Updated: September 18, 2014 23:36 IST2014-09-18T23:36:36+5:302014-09-18T23:36:36+5:30
शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली.

आयसीआयसीआय विमा कंपनीला ग्राहक मंचची चपराक
गोंदिया : शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली. सदर कंपनीला आता एक लाख रूपयांसह तक्रारींचा व इतर खर्चही द्यावा लागणार आहे.
गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील रहिवासी आळकन पटले यांचे पती दुलीचंद लोंढू पटले हे शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जावून पडले. त्यात त्यांचा ५ आॅक्टोबर २००५ त्यांचा मृत्यू झाला. पटले यांनी तहसीलदारांमार्फत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा प्रस्ताव आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे सादर केला. कंपनीने प्रस्ताव मंजूर-नामंजूर काहीही न कळविल्याने वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. मात्र विमा दावा निकाली न लागल्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात प्रकरण २० जून २०१२ रोजी दाखल करण्यात आले. मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर सदर कंपनीच्या व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांचे लेखी जबाब दाखल करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार हजर झाले नसल्याने प्रकरण एकतर्फीच चालविण्यात आले.
आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने आपल्या जबाबात सदर तक्रार मुदतीत दाखल न केल्यामुळे व संपूर्ण कागदपत्रे न दिल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली. मात्र अळकनबाई यांनी ५ एप्रिल २००६ रोजीच विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबतचे गोरेगाव पोलीस ठाण्याची मर्ग सूचना, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यूचा दाखला, सात-बाराचा उतारा, वारसान प्रमाणपत्र, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती आदी कागदपत्रे तक्रारीसह दाखल केली होते. आळकनबाईचे वकील अॅड.उदय क्षीरसागर यांनी सर्व पुरावे सादर केले. विमा कंपनीचे वकील सचिन जायस्वाल यांनी लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा, अशी लेखी सूचना २५ फेब्रुवारी २०१३ रोजी दाखल केली. तसेच तोंडी युक्तीवादासाठी वारंवार संधी देवूनही विरूद्ध पक्षाचे वकील गैरहजर राहीले. त्यामुळे न्यायमंचाने कारणमिमांसा करून तोल जावून विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सिद्ध होते, असे सांगितले व आळकनबाईची तक्रार मान्य केली. त्यानुसार सदर विमा कंपनीने शेतकरी अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये, मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला. (प्रतिनिधी)