शेतीच्या नुकसानभरपाईचा मापदंडच बदलवावा
By Admin | Updated: June 25, 2015 00:44 IST2015-06-25T00:44:16+5:302015-06-25T00:44:16+5:30
खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे.

शेतीच्या नुकसानभरपाईचा मापदंडच बदलवावा
बागायतदारांची भावना : भरपाई मिळणे कठीण
आमगाव : खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे बागायती शेतीमधील पिकांच्या नुकसानभरपाईचा मापदंड अयोग्य असल्याने बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वळद येथील बागायतदार शेतकरी किशोर रहांगडाले यांच्या १४ एकर शेतात बागायती शेतीमधील आंब्याचे, फणसाचे व चिकूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागातर्फे बागायत शेतीच्या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याकरिता सध्या कार्यरत तहसीलदार, खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्वत: बागायत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली, मात्र १२ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्यात आली. या अगोदर दोन वर्षापूर्वी बागायती शेतीच्या नुकसानभरपाई हेक्टर २५ हजार रुपये देण्यात आले होते.
ही पध्दत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांची बागायत शेतीचे जेवढे नुकसान झाले तेवढे मिळत नाही. यावर्षी सुध्दा मागील शासनाच्या निकषाप्रमाणे हेक्टरी २५ हजार देणे गरजेचे होते, अशी भावना रहांगडाले यांनी व्यक्त केली. आता सततच्या पाण्यामुळे व सोसायट्याच्या वाऱ्यामुळे तपासणीनंतर सुध्दा आंबे, चिकूचे खूप नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला किंवा तपासणी करण्यात आली नाही. जवळपास एक महिन्यात आंबे व चिकूचे एक ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.
तसेच आता विविध जातीचे आंब्याचे रोपटे विक्रीस तयार असून त्यावर सुध्दा परिणाम झाला आहे. पाणी आंब्यावर व चिकूवर गेल्याने योग्य भाव मिळाला नाही. अशीच अवस्था संपूर्ण बागायतदार शेतकऱ्यांची आहे. नुकसान भरपाईचा मापदंड योग्यरित्या झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यात व्यापक रोष असल्याची प्रतिक्रिया शेतीनिष्ठ शेतकरी किशोर रहांगडाले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)