प्रमाणपत्र, स्मार्ट कार्डसाठी दिव्यांगाची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:47+5:302021-02-05T07:44:47+5:30
गोंदिया : दिव्यांगाचे प्रमाणपत्र, तसेच स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी शासकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयात जाणाऱ्या दिव्यांगांना विविध अडचणींना सामाेरे ...

प्रमाणपत्र, स्मार्ट कार्डसाठी दिव्यांगाची फरफट
गोंदिया : दिव्यांगाचे प्रमाणपत्र, तसेच स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी शासकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयात जाणाऱ्या दिव्यांगांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. कागदपत्रे घेऊन दिव्यांग अर्धा ते एक तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांचे काम होत नसल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, पण याची अद्यापही दखल न घेतल्याने दिव्यांगाची फरफट सुरूच आहे.
दिव्यांगाचे प्रमाणपत्र पूर्वी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिले जात होते. मात्र, याच इमारतीत आता शासकीय महाविद्यालय सुरू आहे, तर कोविडमुळे मेडिकलची ओपीडी आता बीजीडब्ल्यू रुग्णालयात सुरू आहे. याच ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र आणि स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम केले जाते. ओपीडी व दिव्यांगाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असण्याची गरज आहे. मात्र, ओपीडी आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येणाऱ्यांची एकच रांग असल्याने दिव्यांगांना एक ते अर्धातास रांगेत उभे राहावे लागत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आणि स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे, पण या ठिकाणी कधीच वेळेत कर्मचारी उपस्थित नसतात. परिणामी, बाहेरगावावरून येणाऱ्या दिव्यांगांना एकाच कामासाठी वांरवार यावे लागते. येथील बरेच कर्मचारी विदर्भविर असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकानुसार त्यांचे काम चालते. या संदर्भात दिव्यांगांनी अनेकदा रुग्णालय व्यवस्थापन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. मंगळवारी आमगाव येथील लखनसिंह कटरे हे दिव्यांगाचे स्मार्ट तयार करण्यासाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयात गेले असता, अर्धा तास रांगेत उभे राहिल्यानंतरही त्यांचा नंबर लागला नाही. एकाच रांगेत ओपीडीचे रुग्ण आणि दिव्यांगाना प्रमाणपत्रासाठी उभे केले जात असल्याने अर्धा ते पाऊण तास लागला. त्यामुळे भोवळ आल्यासारखे झाले. अखेर त्यांनी हा सर्व प्रकार पाहून बीजीडब्ल्यूचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे याची तक्रार करण्यासाठी गेले असता, त्यांनी ही बाब आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसून, अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करण्यास सांगितले. आधीच दिव्यांग असल्याने त्रास सहन करावा लागत असताना, आता त्यांना तक्रार करण्यासाठी पायपीट करावी लागली, असाच अनुभव अनेक दिव्यांगाचा आहे. त्यामुळे यात सुधारणा केव्हा होणार, असा सवाल दिव्यांगांनी केला आहे.
..... कोट
दिव्यांगाचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, बीजीडब्ल्यू रुग्णालयात ओपीडीचे रुग्ण आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना एकाच रांगेत उभे केले जात आहे. मलाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
- लखनसिंह कटरे, बोरकन्हार
......
दिव्यांगासाठी प्रमणापत्र वितरण, तसेच इतर कागदपत्रांसाठी अनेकदा रुग्णालयाच्या हेलपाटे मारल्यानंतरही काम होत नाही. येथील कर्मचारीही कधीच वेळेत उपस्थित राहत नाही. या संदर्भात अनेकदा तक्रारही केली, पण त्याचा कसलाच परिणाम झाला नाही.
- श्यामसुंदर बन्सोड, दिव्यांग