जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचे शतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:54+5:30
दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात १२ जूनला दुबईहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर आठ दिवसांच्या कालावधीतच कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला होता.मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यापैकी बरेच रुग्ण कोरोनामुक्त होवून आतापर्यत घरी परतले आहे.जिल्ह्यात मार्च ते २५ जूनपर्यंत एकूण १०४ कोरोना बाधित रुग्ण आढळले.

जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचे शतक पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १८ कोरोना बाधितांपैकी गुरुवारी (दि.२५) १४ जण कोरोनामुक्त झाले. तर नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत शंभर कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या स्थितीत जिल्ह्यात केवळ चार अॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
दोनदा कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात १२ जूनला दुबईहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर आठ दिवसांच्या कालावधीतच कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला होता.मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यापैकी बरेच रुग्ण कोरोनामुक्त होवून आतापर्यत घरी परतले आहे.जिल्ह्यात मार्च ते २५ जूनपर्यंत एकूण १०४ कोरोना बाधित रुग्ण आढळले.यापैकी गुरूवारपर्यंत शंभर कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे सध्या स्थितीत केवळ ४ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार कोरोना बाधितांवर उपचार करित असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा दिवसात गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. गुरूवारी कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.
यावेळी कोविड केअर सेंटरमधील सर्व डॉक्टरांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच सुटी देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन करुन घरी गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती दिली.
आत्तापर्यंत २१३५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २२३९ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर २१३५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ११९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने ही दिलासादायक बाब आहे.