गोंदिया : रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेले २ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम काटी येथे शुक्रवारी (दि.५) ही कारवाई करण्यात आली आहे. यात पोलिसांनी १३.६० लाखांचा माल जप्त केला आहे.
ग्राम कासा येथील सनतलाल कोठू खैरवार (३५) विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्राॅली क्रमांक एमएच ३५-एफ २९३६ लावून विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना, शुक्रवारी (दि.५) हवालदार भुवनलाल देशमुख यांनी त्याला पकडले. पोलिसांनी चार हजार रुपये किमतीची रेती व सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे, तर दुसरी कारवाई याच ठिकाणी करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मारोतराव मेश्राम (४०) यांनी सूर्याटोला-रामनगर येथील नावेद अब्दुल कलाम शेख (३५) याला विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना पकडले. जप्त करण्यात आलेल्या रेतीची किंमत चार हजार तर ट्रॅक्टरची किंमत सहा लाख ५० हजार रुपये सांगितली जाते. अशा प्रकारे दोन्ही कारवायांत १३ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.