लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. व्यापारीक दृष्टिकोनातून सुद्धा या जिल्ह्याचे महत्व आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांची सीमा लागू असून, हावडा-मुंबई मार्गावरील हे एक महत्वपूर्ण शहर आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला असून, लवकरच त्याचा विस्तार अधिक केला जाईल. बिरसी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला रविवारपासून (दि.१३) प्रारंभ झाला. याचा शुभारंभ केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंदूर येथून आभास पद्धतीने केला. यावेळी ते बोलत होते. फ्लाय बिग या कंपनीने इंदूर-गोंदिया-हैद्राबाद या प्रवासी विमान वाहतूक सेवेला रविवारपासून प्रारंभ केला. या निमित्त बिरसी विमानतळावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने इंदूर येथून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, गोंदिया येथून खा. सुनील मेंढे, अशोक नेते, ढालसिंग बिसेन, आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, राजेंद्र जैन, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाडी, जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक के.वी.बैजू, प्लाय बिग कंपनीचे संजय मांडविया, रतन आंभोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सिंधिया म्हणाले गोंदिया आणि इंदूर येथील जनतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून, या सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलगंणा या चार राज्यांना जोडण्यास मदत झाली आहे. या राज्यांना जोडणार गोंदिया जिल्हा महत्वपूर्ण दुवा आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून विमान वाहतूक सेवेमुळे पर्यटनास चालना देण्यास सुद्धा मदत होणार आहे. विमानसेवेच्या माध्यमातून लहान लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा सर्वांगीन विकास करणे हे मोदी सरकारचे मुख्य ध्येय असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. यावेळी खा. सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाल्याने विकासाचे नवे दालन खुले झाले असून याचा निश्चितच जिल्हावासीयांना उपयोग होणार असल्याचे सांगितले. प्रवाशांमध्ये उत्साह - तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर बिरसी विमानतळावरून प्रत्यक्षात रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाल्याने प्रवाशांमध्ये कमालीचा उत्साह होता. इंदूरहून बिरसी विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचे यावेळी फ्लाय बिग आणि बिरसी विमानतळ प्राधिकरणाकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान प्रवासी विमान वाहतूक सेवेला घेवून जिल्हावासीयांमध्ये उत्साह होता.
विमानतळ उभारणीचे श्रेय पटेलांना तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दूरदृष्टीकोन बाळगून बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ स्थापन केले. १२७० एकरवर या विमानतळाचा विस्तार असून धावपट्टी देखील मोठी आहे. शिवाय पायलट प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे. ही गोंदिया जिल्हावासीयांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. बिरसी विमानतळ उभारणीचे श्रेय खऱ्या अर्थाने प्रफुल्ल पटेल यांना जात असल्याची ग्वाही सुद्धा सिंधिया यांनी दिली.आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होणारकेंद्र सरकारने उड्डाण योजनेतंर्गत छोट्या, छोट्या शहरांना विमान वाहतूक सेवेने जोडून त्यांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणार असल्याचे माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले.