८८३२ क्विंटल धानाची खरेदी
By Admin | Updated: October 29, 2016 01:03 IST2016-10-29T01:03:02+5:302016-10-29T01:03:02+5:30
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पैसा यावा यासाठी गेल्या सोमवारपासून (दि.२४) सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी

८८३२ क्विंटल धानाची खरेदी
६५ लाखांचे चुकारे : आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर अल्प प्रतिसाद
गोंदिया : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पैसा यावा यासाठी गेल्या सोमवारपासून (दि.२४) सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रांवर पाच दिवसात ८८३२ क्विंटल धानाची आवक झाली आहे. १ कोटी ६० लाख रुपयांच्या या धानापैकी ६५ लाख रुपयांचे चुकारे झाले असून उर्वरित चुकारे मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेतकऱ्यांची गरज पाहून व्यापाऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी केला जाऊ नये यासाठी दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे सोमवारपासून (दि.२४) धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात यावर्षी एकूण ७९ केंद्रांवर शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदी होणार आहे. त्यात राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या ५६ केंद्रांपैकी गेल्या पाच दिवसात ४० केंद्र तर आदिवासी विकास महामंडळाच्या २३ केंद्रांपैकी १४ धान खरेदी केंद्र उघडण्यात आली आहेत. आत मार्केटिंग फेडरेशनने ८ हजार ६०४ क्विंटल धान खरेदी केले. त्याची किंमत १ कोटी २६ हजार ४८ हजार आहे. त्यापैकी ६५ लाखांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयात खरीप हंगाम ३१ मार्च २०१७ पर्यंत आणि रबी हंगाम १ मे २०१७ ते ३० जून २०१७ पर्यंत निर्धारीत केलेले धानाचे दर प्रतिक्विंटल ‘ए’ ग्रेड धानासाठी १५१० रुपये तर साधारण ग्रेडसाठी १४७० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
चिचगड येथे
खरेदीचा शुभारंभ
चिचगड : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चिचगड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी माजी आ.रामरतन राऊत, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगन वारई, उपाध्यक्ष विजय कश्यप, व्यवस्थापक मारोतराव खंडारे, माजी जि.प. अध्यक्ष प्रल्हाद भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शामराव गोविंदा शहारे या शेतकऱ्यांचे धान मोजून उद्घाटन करण्यात आले. दिवाळीपूर्वी धान खरेदी ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे.
तेढ्यात केंद्र सुरू
निंबा(तेढा) : तेढा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटक तलाठी एल.एम.पराते तर अध्यक्षस्थानी पोलीस पाटील युवराज वाघमारे तसेच तानुटोला, पठाणटोला, हलबीटोला (तेढा), हलबीटोला (निंबा), तुमसर व चिचटोला येथील शेतकरी संस्थेचे सचिव एच.आर.भोयर व शिपाई पी.एम.राऊत उपस्थित होते.
उद्घाटक पराते यांनी शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रात धान विक्री केल्याने कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली व जास्तीत या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. (वार्ताहर)
-आज मिळणार चुकारे
आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उघडलेल्या १४ केंद्रांपैकी १२ केंद्रांवर शुक्रवारपर्यंत जेमतेम २२८ क्विंटल धान आला होता. त्याची किंमत ३ लाख ३५ हजार २०४ रुपये आहे.
चुकाऱ्यांसाठी बँकांची लिमिट मंजुर झाली असून शनिवारी बँका सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महामंडळाच्या खरेदीसाठी सध्यातरी बारदाणा पुरेसा आहे. मात्र दिवाळीमुळे ३-४ दिवस खरेदी केंद्रांवर हमाल येत नाहीत. दिवाळीनंतर धान खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.