आरोग्य केंद्रापेक्षा व्यापारी गाळे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:36 IST2018-03-31T21:36:36+5:302018-03-31T21:36:36+5:30
व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे.

आरोग्य केंद्रापेक्षा व्यापारी गाळे महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे.
आमगाव शहराच्या मध्यभागी नगर परिषद परिक्षेत्रात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे केंद्र छत्तीसगड आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असल्याने या आरोग्य केंद्रात दूरवरुन शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. परंतु या रुग्णालय परिसरात राजकीय पुढारी व जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापारी गाळ्यांचा घोळ पुढे केला आहे. या परिसरात पूर्वीच अकरा गाळे बांधकाम करुन जिल्हा परिषदने रुग्णसेवा चव्हाट्यावर आणली. या गाळ्यांचे प्रकरण आताही न्याय प्रविष्ठ आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने स्थानिक रुग्ण कल्याण समिती व प्रशासक नगर परिषद, नगर रचनाकार विभाग यांना डावलून याच परिसरात आरोग्य केंद्राच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करुन ३० लाख रुपयांच्या गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तीनशे रुग्ण उपचारासाठी येतात. वर्षाकाठी अडीशे ते तिनशे महिलांची प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, साथीचे आजार, मृत्यूदर कमी करणे, कुपोषण, महिला बाल विकास व दुर्धर आजाराविषयी जनजागृती अभियान राबविले जाते. परंतु सदर सेवांना बाधीत करुन या रुग्णालय परिसरात व्यापारी गाळे निर्माण करुन आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. जि.प. बांधकाम विभागातील व पदाधिकारी यांची लेखी तक्रार करण्यात आली आहे. दोषींवर कारवाही करण्याच्या मागणीचे पत्र नागरिकांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शासन यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.