कपिल केकत
गोंदिया : संसर्गजन्य असलेल्या कोरोनाने मागील वर्षापासून अवघ्या जगाला झपाटून सोडले आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कधीही विसरता येणार नाही असाच राहिला आहे. यामुळे नागरिक आता अधिकच दहशतीत वावरत असून सर्वाधिक खबरदारी आता प्रवासात घेतली जात आहे. प्रवासादरम्यान बाधिताच्या संपर्कात येऊन कोरोना होण्याची शक्यता असतानाच प्रवासी वाहनातूनही त्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेत राज्य रस्ते परिवहन महामंडळाने आता आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसचे ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग करण्याचे ठरविले आहे. यासाठी जिल्ह्यातील ७० बसचे कोटिंग केले जाणार आहे. राज्यात कोटिंगच्या कामाला सुरुवात झाली असून अद्याप जिल्ह्यातील दोन्ही आगारांतील बसना कोटिंगची प्रतीक्षा आहे.
--------------------------------
किती बसला होणार कोटिंग ?
आगार एकूण बस
गोंदिया ४५
तिरोडा २५
---------------------------
एका एसटीला वर्षातून आठवेळा होणार कोटिंग
कोटिंगसाठी दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. यात एक कंपनी सहा महिन्यांतून एकदा कोटिंग करणार आहे. तर दुसरी कंपनी दोन महिन्यांतून एकदा कोटिंग करणार आहे. म्हणजेच वर्षातून आठवेळा बसचे कोटिंग केले जाणार असल्याची माहिती आहे.
--------------------------
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास ?
-एसटीने प्रवास करताना एखादी बाधित व्यक्त उठून गेली तर कोटिंगमुळे तेथे बसणाऱ्या अन्य प्रवासाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता राहणार नाही.
- मात्र प्रवासादरम्यान एखादी बाधित व्यक्ती बाजूलाच बसून असल्यास मात्र संसर्गाचा धोका कसा टाळता येणार.
-----------------------
प्रवासी म्हणतात...
एसटीतून प्रवास करताना कोटिंगमुळे आता कोरोनाचा धोका कमी होणार असे बोलले जात आहे; मात्र प्रवासादरम्यान बाधित व्यक्तीचा संपर्क आल्यास भीती राहणारच. शिवाय, आतापर्यंत सॅनिटायझर वापरूनही कोरोना पसरत आहेच.
- गौरव शर्मा
-----------------------------
बसला कोटिंग केल्याने आता कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार असल्याचे बोलले जात आहे; मात्र आतापर्यंत बस सॅनिटाईज करून चालविल्या तेव्हा धोका होता म्हणावा लागेल. तर एखादा बाधित बसमध्ये संपर्कात आता तर मात्र धोका राहणारच आहे.
- कृष्णकुमार माहुले
------------------------------
पथक आले नाही....
बसच्या कोटिंगबाबत पथक येणार असल्याचे पत्र आले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत यासंदर्भात आणखी काही माहिती मिळाली नसून कोटिंग करणारे पथकही आलेले नाही.
- संजना पटले
आगारप्रमुख, गोंदिया.