दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा बोजा शाळांवर; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:30+5:302021-04-21T04:29:30+5:30
गोंदिया : पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व परीक्षेसंबंधी साहित्य शाळांना पाठविले. शाळांमध्ये हे ...

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा बोजा शाळांवर; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!
गोंदिया : पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व परीक्षेसंबंधी साहित्य शाळांना पाठविले. शाळांमध्ये हे साहित्य असताना ते साहित्य चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे.
बहुतेक शाळांमध्ये चौकीदार नसतात. चौकीदार ठेवण्याची तशी शासनाची तरतूदही नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये ६० ते ७० टक्के कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आजघडीला आहेत. शासनाने मागच्या पाच ते दहा वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. शाळांमध्ये रात्रपाळीचे चौकीदार नाहीत. शाळेत असलेल्या परीक्षा उपयोगी साहित्याकडे कुणी लक्ष ठेवावे या पेचात शाळा प्रमुख व केंद्रप्रमुख सापडले आहेत. ३० एप्रिलपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविल्यास त्यांना काही झाल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाईल, असे पत्र शिक्षण उपसंचालकांनी काढले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत बाेलावता येत नाही. परीक्षेसंबंधी साहित्याची देखभाल करणे आणि त्या कामासाठी कुणाचेच सहकार्य नाही, अशा पेचात संस्था, शाळाप्रमुख व केंद्राध्यक्ष अडकले आहेत. ही मोठी समस्या शाळा प्रमुखांसमोर उभी ठाकली आहे. या साहित्याच्या संबंधाने मुख्याध्यापक व केंद्राध्यक्ष यांच्यात धाकधूक वाढली आहे.
..............
कोट
कोऱ्या उत्तरपत्रिका व इतर साहित्य सांभाळण्यासाठी शाळांकडे यंत्रणा नाही त्यामुळे हे साहित्य पोलीस ठाण्यात किंवा तहसीलदारांच्या कस्टडीत ठेवण्यात आले तर बरे होईल.
- व्ही.डी. मेश्राम, अध्यक्ष शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना
....
कोरोनाच्या काळात चौकीदार नाही आणि शाळा प्रमुखावरच जबाबदारी, तर २४ तास कशी राखण करणार, यासाठी मंडळाने याचा गांभीर्याने विचार करून या कालावधीत चौकीदार नेमावेत.
- टी.एस. गौतम, मुख्याध्यापक मानवता विद्यालय, बेरडीपार
........
कोऱ्या उत्तरपत्रिका व इतर साहित्य सांभाळण्याचा ताप मुख्याध्यापक व केंद्राध्यक्षांवर आहे. कोविडच्या संकट काळात आमचाही विचार करण्यात यावा. त्यासाठी शिक्षण मंडळाने तोडगा काढावा.
- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती विद्यालय अर्जुनी-माेरगाव.
...............................
हे साहित्य कस्टडीत
कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्ट, स्टीकर, सीटिंग प्लॅन, ए.बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य हे मुख्याध्यापक व केंद्राध्यक्षांच्या कस्टडीत देण्यात आले आहे.
.....
विद्यार्थ्यांची आकडेवारी
दहावीचे विद्यार्थी- २२५२२
बारावीचे विद्यार्थी- २०८५६
........
परीक्षा कधी?
पुढील प्रवेश कधी?
१) इयत्ता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झाला नाही तर या परीक्षा पुढे वाढतील.
२) इयत्ता बारावीच्या परीक्षा १० जूननंतर घेण्याचे ठरविण्यात आले; परंतु कोरोनाची काय स्थिती राहते यावर पुढच्या परीक्षा ठरणार आहेत.
३) परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात निकाल लावण्यात येणार आहे. निकाल हातात आल्यानंतर लगेच पुढच्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.
४) पुढील प्रवेश ऑगस्ट महिन्यात होणार असे आता गृहीत धरण्यात आले आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग लांबला तर या परीक्षा व प्रवेशही लांबणार आहे.