पालिकेचा १५४ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:33 IST2019-02-28T22:33:31+5:302019-02-28T22:33:53+5:30
स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १३६ कोटीेंच्या अर्थसंकल्पात पुन्हा १८ कोटी रुपयांची भर पडली आहे. गुरूवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या आमसभेत एकूण १५४ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

पालिकेचा १५४ कोटींचा अर्थसंकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १३६ कोटीेंच्या अर्थसंकल्पात पुन्हा १८ कोटी रुपयांची भर पडली आहे. गुरूवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या आमसभेत एकूण १५४ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आमसभेत पारीत करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही नवीन प्रयोगांचा समावेश असतानाच काही विभागांसाठी निधीची तरतूद वाढविण्यात आली आहे.
नगर परिषदेने बुधवारी (दि.२६) १३६ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प सादर केला होता. यासाठी स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली होती व त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आमसभेची मंजुरी घ्यावयाची असल्याने गुरूवारी (दि.२८) विशेष आमसभा घेण्यात आली.
या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा करीत काही गंभीर व अत्यावश्यक विषयांसाठी अधिकची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी अर्थसंकल्पात आणखी १८ कोटींची भर पडली. अशात १३६ कोटींऐवजी १५४ कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला व त्याला आमसभेत मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सभेला शकील मंसुरी, दीपक बोबडे, आशालता चौधरी, विमल मानकर, रत्नमाला साहू, पक्षनेता घनशाम पानतवने, सुनील भालेराव, सतीश देशमुख, राजकुमार कुथे, सुनील तिवारी, निर्मला मिश्रा, कुंदा पंचबुद्धे, शिलू चव्हाण, सचिन शेंडे, अनिता मेश्राम, नेहा नायक उपस्थित होते.
हे आहेत नवीन विषय
सभेत नगर परिषद शिक्षण विभागाच्या विकासावर जोर देण्यात आला. यासह महिला व पुरूषांसाठी जीम निर्माण, वाचनालय, जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन गृह, पार्कींग, प्रवासी निवास, चौकांचे सौंदर्यीकरण, रस्ता दुभाजक व त्यांचे विद्युतीकरण, नवीन बगिच्यांची निर्मिती, वाहतुकीच्या जागावर सुलभ सुविधागृह, मोक्षधामचे सौंदर्यीकरण व दवाखान्यांची स्थापना आदि विषय मांडण्यात आले. शिवाय रस्ते बांधकामासाठी असलेली १.६० कोटींची तरतूद वाढवून ३ कोटी करणे, महिला-बाल कल्याण विभागासाठी असलेली ७५ लाखांची तरतूद वाढवून १.५० कोटी करणे, पंप हाऊस दुरूस्तीसाठी असलेली २० लाखाची तरतूद वाढवून २ कोटी करणे आदि सूचना नगसेवकांनी केल्या असल्याची माहिती आहे.
शिक्षक ४ महिन्यांपासून पगाराविना
अर्थसंकल्पाला घेऊन बोलाविण्यात आलेल्या सभेत नगर परिषद शिक्षण विभागावर जोर देण्यात आला. मात्र नगर परिषद शाळांत एका एजंसी मार्फ त तासीका तत्वावरील शिक्षक मागील ४ महिन्यांपासून पगाराविना असल्याचा विषय नगरसेवक सुनील तिवारी यांनी मांडला. एजंसीचे बील निघत असताना त्यांना पगार का दिला जात नाही असा मुद्दा त्यांनी मांडला. शिवाय कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकांची गरज असताना तेथे शिक्षकाची नियुक्ती न करता अन्यत्र एजंसीमार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्यावर त्यांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे, तिवारी यांच्या या मुद्द्यावर उपस्थित अन्य नगसेवकांनी दुजोरा देत शिक्षण विभागाकडे होत असलेल्या दुर्लक्षाला घेऊन चांगलाच रोष व्यक्त केला.
पैशांची व्यवस्था करायची कुठून
नगर परिषदेने स्थायी समितीच्या सभेत १३६ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प मांडला होता. त्यात काही ठिकाणी निधीची जास्त तरतूद करण्याच्या सूचना देत १८ कोटी रुपयांनी वाढ झाली. त्यानंतर गुरूवारी (दि.२८) अर्थसंकल्पाच्या विशेष सर्व साधारण सभेत १५४ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र सभेत नगरसेवकांनी वाढविण्यात आलेल्या खर्चांची पूर्तता करण्यासाठी पैशांची व्यवस्था करायची कोठून असा सवाल उपस्थित केला. एकंदर स्थायी समितीने दिलेल्या सूचनांमुळे झालेल्या खर्च वाढीला घेऊन सर्वसाधारण सभेत त्याचा विरोध दिसून आला