राजकीय अस्तित्वासाठी बौध्द समाज एकवटणार
By Admin | Updated: September 16, 2014 23:50 IST2014-09-16T23:50:07+5:302014-09-16T23:50:07+5:30
बौध्द समाजाच्या होत असलेल्या राजकीय अध:पतनाला आळा घालण्यासाठी तालुक्यातील बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन बैठकीचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात

राजकीय अस्तित्वासाठी बौध्द समाज एकवटणार
अर्जुनी/मोरगाव : बौध्द समाजाच्या होत असलेल्या राजकीय अध:पतनाला आळा घालण्यासाठी तालुक्यातील बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन बैठकीचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीत समाजाच्या वतीने एकच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
ही सभा १४ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. १९ सप्टेंबर रोजी कालीमाटी (प्रतापगड) येथे आयोजित बौध्द समाजाच्या चिंतन बैठकीत याबाबतची रुपरेषा ठरणार आहे. या बैठकीत तालुक्यातील गटागटात विखुरलेल्या बौध्द समाजाला एकत्रित करून समाज संघटनेचे बळकटीकरण करणे, आंबेडकरी चळवळीला अधिक गतीमान करणे, राजकीय क्षेत्रात समाजाची होत असलेली गळचेपी व पिछेहाट दूर करणे, संघटित होऊन आगामी निवडणुकांमध्ये सामाजिक अस्तित्वाचे प्रदर्शन करणे या संदर्भात निर्णय घेण्यात आले.
१९६२ पासून संयुक्त एकीकृत रिपब्लीकन पक्षाने अनेक खासदार व आमदार निवडून आणले. ही बाब काही विघ्नसंतोषी पुढाऱ्यांच्या मनात खटकल्याने रिपब्लीकन पक्षात खिंडार पाडण्याचे कटकारस्थान रचण्यात आले. अखेर विविध गटात ताटातूट झाली व सत्तापिपासू नेत्यांनी आपापली वेगळी दुकानदारी थाटली. येथेच बौध्द समाजाचे राजकीय अस्तित्व संपल्याने मातब्बर पुढाऱ्यांनी समाजाचे खच्चीकरण सुरू केले आहे. दुभंगलेल्या या समाजाचे एकत्रीकरण व्हावे व समाजाच्या एकतेचे प्रदर्शन दाखविण्याच्या दृष्टीने अर्जुनी/मोरगाव तालुका बौध्द समाज संघटनेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्ष सोनदास गणवीर, उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, सचिव यशवंत गणवीर, सहसचिव सुरेंद्रकुमार ठवरे, कोषाध्यक्ष नाना शहारे तर सदस्य म्हणून सुभाष मेश्राम, गोपाल रामटेके, चंद्रभान टेंभुर्णे, दलित भोयर, मोरेश्वर धारगावे, राहुल रामटेके, राजू लाडे, हिवराज रामटेके व शीतल लाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.