बीएसएनएलचे १५ टॉवर बंद
By Admin | Updated: December 28, 2016 02:29 IST2016-12-28T02:29:10+5:302016-12-28T02:29:10+5:30
केंद्र सरकारने केलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीमुळे पैशाची टंचाई निर्माण झाली.

बीएसएनएलचे १५ टॉवर बंद
नरेश रहिले गोंदिया
केंद्र सरकारने केलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीमुळे पैशाची टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कॅशलेसची संकल्पना पुढे केली. कॅशलेस व्यवहारात मोबाईलची भूमिका महत्वाची राहणार आहे. मात्र त्यात केंद्र सरकारचीच कंपनी असलेल्या बीएसएनएलकडून अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १५ टॉवर विविध कारणांनी बंद आहेत.
नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावा, मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. रोख रकमेवर लगाम लावण्यासाठी सरकारने कॅशलेस व्यवहार करा, असे आवाहन केले. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार खोळंबत आहे.
ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवरच नाही. ज्या ठिकाणी टॉवर आहे तिथे कव्हरेज नाही. यासंदर्भात जिल्ह्यात किती मोबाईल टॉवर आहेत याची माहिती घेतली असता जिल्ह्याच्या आठ तालुक्यात बीएसएनएलचे १०० टॉवर असल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी १५ टॉवर मागील एक ते पाच वर्षापासून बंद पडले आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४ टॉवर असून त्यातील झाशीनगर, बाक्टी येथील दोन टॉवर बंद आहेत. आमगाव तालुक्यात ८ टॉवर असून त्यातील करंजी येथील एक टॉवर बंद आहे. देवरी तालुक्यात १४ टॉवर असून त्यातील पुराडा, घोनाडी, पिंडकेपार येथील तीन टॉवर बंद आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ८ टॉवर असून त्यातील गिरोला येथील टॉवर बंद आहे.
तिरोडा तालुक्यात ११ टॉवर असून त्यातील परसवाडा, इंदोरा खुर्द व अर्जुनी असे तीन टॉवर बंद आहेत. गोरेगाव तालुक्यात ११ टॉवर असून त्यातील हिरापूर, तुमखेडा असे दोन टॉवर बंद आहेत. गोंदिया तालुक्यात ३१ टॉवर असून त्यातील मोहगाव, महालगाव व नवेगावखुर्द असे तीन टॉवर बंद आहेत.
सालेकसा तालुक्यात तीन टॉवर आहेत. स्पेअर्स कार्ड व कनेक्टीव्हीटीमुळे टॉवर बंद असल्याची माहिती देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील क्षेत्र रेंजमध्ये आहे किती क्षेत्र रेंजमध्ये नाही याची कसलीही माहीती बीएसएनकडे उपलब्ध नाही.
नक्षलग्रस्त भागासाठी १७ नवीन टॉवर
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल क्षेत्र आहे. शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागात अश्या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात येत आहे. त्यात कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बीजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या गावांचा समावेश आहे.