दुर्लक्षित वस्तीतील बहिणींना भाऊबीजेची भेट
By Admin | Updated: November 4, 2016 01:33 IST2016-11-04T01:33:05+5:302016-11-04T01:33:05+5:30
समाजातील दुर्लक्षित लोकवस्तीतील दुर्बलांना मदतीचा हात देण्यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे उपक्रम राबविण्यात आला.

दुर्लक्षित वस्तीतील बहिणींना भाऊबीजेची भेट
युवा शक्ती फाऊंडेशनचा उपक्रम : बालकांसोबत फोडले फटाके
आमगाव : समाजातील दुर्लक्षित लोकवस्तीतील दुर्बलांना मदतीचा हात देण्यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे उपक्रम राबविण्यात आला. त्या वस्तीतील बहिणींना भाऊबिजेची भेट देण्यात आली.
आमगाव शहराच्या या मोहल्ल्यातील शैक्षणिक मागासलेपणा तसेच घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही शासनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही लोकवस्ती चर्चेत यावी यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनचे यशवंत मानकर, राकेश शेंडे, रितेश अग्रवाल, राजीव फुंडे, ज्योती खोटेले, मंगला महारवाडे, राजेश मानकर, निखील कोसरकर, नरेंद्र कावळे, कृष्णा चुटे, किसन तिवारी, रघुनाथ भुते यांनी दिवाळी व भाऊबीजेचा उपक्रम हाती घेतला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राठोड म्हणाले, सामाजिक भावना जोपासून आर्थिक दुर्बलांकरिता प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून पुढाकार घ्यावा, दुर्लक्षित लोक वस्तीत अशा उपक्रमांचे आयोजन केल्यास ते इतरांसाठी आदर्श ठरेल. पोलीस उपनिरीक्षक शिंदे म्हणाले, नागरिकांना दिशा देणारे उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी जगतो परंतु इतरांसाठी जगण्याची प्रेरणा प्रत्येकाने जोपासावी. लोकवस्तीतील महिलांनी दिलेल्या आपुलकीचे हे क्षण अविस्मरणीय राहतील. यावेळी महिलांना भाऊबिजेची भेट म्हणून भेट वस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन यशवंत मानकर यांनी केले. यावेळी बालकांसोबत फटाके फोडून सण साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश महारवाडे, बंटी, हरिष खरकाटे, सोनू महारवाडे, संजय खोटेले यांनी सहकार्य केले. दिवे लावून व फटाके फोडून यावेळी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी )