कचरामुक्तीसाठी हातात घेतला झाडू

By Admin | Updated: August 8, 2014 00:03 IST2014-08-08T00:03:31+5:302014-08-08T00:03:31+5:30

रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे.

The broom taken in the hand for the removal of waste | कचरामुक्तीसाठी हातात घेतला झाडू

कचरामुक्तीसाठी हातात घेतला झाडू

 गोंदिया : गोंदिया शहरातील कोणत्याही रस्त्याने गेलो तरी रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे. परंतू शहराची ही ओळख पुसून टाकून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच नागरिकांनाही स्वच्छतेची सवय लावण्याचा चंग येथील सावजी शिक्षण संस्थेने बांधला. त्यानुसार संस्थेचे संचालक सुरेश चौरागडे यांच्या पुढाकाराने शहरात अनोख्या पद्धतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या ‘गंदगी हटाओ’ अभियानात शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला ठाणेदार जयराज रणवर यांच्या हस्ते माल्यार्पण करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी अस्वच्छतेमुळे वाढणारी रोगराई, त्याचे दुष्परिणाम याचे महत्व सांगत सर्वांना स्वच्छतेचे महत्व यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर संचालक सुरेश चौरागडे यांच्यासह सर्वांनी हातात झाडू आणि टोपले, फावडे घेऊन ठिकठिकाणचा कचरा साफ करण्यास सुरूवात केली.
कचरा हटविण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर लावून शहरातील एकेका भागात दररोज हे अभियान राबविले जात आहे.
संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि आपले मार्गदर्शक माजी आ.हरिहरभाई पटेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण हे अभियान सुरू केल्याचे चौरागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यात परिसरातील नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. बुधवारी माजी नगराध्यक्ष दीपक पटेल यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. नागरिकांनी यात सहभागी होऊन शहर स्वच्छ करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: The broom taken in the hand for the removal of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.