लाचखोर मुख्याध्यापक अडकला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 21:53 IST2017-12-23T21:53:39+5:302017-12-23T21:53:55+5:30
अर्जित रजेच्या थकबाकीचे बिल काढून देण्यासाठी कमिशन म्हणून तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

लाचखोर मुख्याध्यापक अडकला जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जित रजेच्या थकबाकीचे बिल काढून देण्यासाठी कमिशन म्हणून तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई शनिवारी (दि.२३) रोजी सकाळी तालुक्यातील नवेगाव-धापेवाडा येथील मातोश्री मिराबाई अनुदानित आश्रमशाळेत करण्यात आली. संतोष नत्थूलाल कटरे (३३) असे लाचेची मागणी करणाºया सहायक शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापकाचे (माध्यमिक) नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार मातोश्री मिराबाई आश्रमशाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. सन २०१६-१७ मध्ये मंजूर ३० दिवसांची अर्जित रजा त्यांनी १४ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत उपभोगली. यासाठी त्यांचे या कालवाधीचे वेतन थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर या कालावधीचे वेतन त्यांना आॅक्टोबर महिन्यात मिळाले. २० डिसेंबर रोजी तक्रारदार आश्रमशाळेत कर्तव्यावर असताना प्रभारी मुख्याध्यापक कटरे याने रजेचे बिल काढून दिले यासाठी १० टक्के म्हणजेच तीन हजार रूपये देण्याची मागणी केली. यावर मात्र तक्रारदाराने गुरूवारी (दि.२१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.२३) सकाळी आश्रमशाळेत सापळा लावला. यात प्रभारी मुख्याध्यापक कटरे पंचांसमक्ष तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहात अडकला. दवनीवाडा पोलिसांत कटरे विरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३ (१),(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.