‘अतिक्रमण हटाओ’ मोहिमेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:50 IST2018-04-05T20:50:25+5:302018-04-05T20:50:25+5:30

‘अतिक्रमण हटाओ’ मोहिमेला ब्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अतिक्रमण हटाओ मोहिमेंतर्गत नगर परिषदेने शहरातील कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या माहिमेविरोधात दोघांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे (स्टेटस-को) आदेश दिले. याप्रकरणी येत्या २५ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या मोहीमेला ब्रेक लागला आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे शहराचे पुर्णपणे विद्रुपीकरण होत आहे. शहरातील आतील भागाचे तर सोडाच, मात्र मुख्य मार्ग ही अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. परिणामी शहरात दररोज वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. शहराची वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरातील मुख्य मार्गांचे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
यासाठी भूमी अभिलेख विभागाला मुख्य मार्गांची मोजणी व मार्कींग करण्याचे काम देण्यात आले. भूमी अभिलेख विभागाकडून होत असलेल्या विलंबामुळे अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर पडली होती. त्यानंतर कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय या मार्गाची मोजणी करण्यात आली. त्यानुसार, नगर परिषदेने २६ मार्च रोजी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम हाती घेतली. यात मोहिमेत मार्गावरील काहींचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र काही लोकांकडून या मोहिमेला घेऊन चांगलाच गोंधळ घालण्यात आला.
विशेष म्हणजे, अतिक्रमण काढण्यात आलेले देवेंद्र यशवंत कावडे (रा.टी.बी.टोली) व बाबुलाल गौतम (रा. बिसेन पेट्रोप पंपच्या मागे) यांनी त्यांच्या अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेण्यासाठी २५ तारखेला सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत मोहीमेला स्टेटस-को चे आदेश दिले आहे.