बांधकाम कराराचा भंग
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T01:03:10+5:302014-07-14T01:03:10+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने नुकत्याच

बांधकाम कराराचा भंग
ग्राहक मंचचा निवाडा : तक्रारकर्त्याला मिळणार व्याजासह रक्कम
गोंदिया : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने नुकत्याच केलेल्या न्यायनिवाड्यात गोंदियातील कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअर मायकल पुंडकर यांनी बांधकाम करार भंग केल्याचे सिद्ध केले. यात पुंडकर यांनी तक्रारकर्त्याला ६८ हजार ५२५ रूपये १० टक्के व्याजाने, मानसिक त्रासापोटी १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्वावे, असा आदेश न्यायमंचने दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नानक एच. उदासी हे सध्या उल्हासनगर ठाणे येथे राहत असून त्यांची वडिलोपार्जित जागा मुर्री येथे आहे. ती जागा ४० वर्षापासून बांधकाम न झालेल्या स्थितीत होती. त्यांना तेथे वडिलांच्या इच्छेप्रमाणे घर व गुरूद्वारा बांधयची होती. त्यासाठी त्यांनी युनियन बँक आॅफ इंडियाकडून १० लाख रूपयांचे कर्जही घेतले होते. त्यांनी गोंदिया न.प. कडून डेव्हलपमेंट प्लॅन सन २००७ मध्ये मंजूर करून घेतला होता. बांधकामासाठी त्यांनी खमारी येथील रहिवासी व गोंदियाच्या जयस्तंभ चौकातील कन्सल्टींग सिव्हील इंजिनियर मायकेल पुंडकर यांच्याशी करारनामा करवून घेतला. यात पुंडकर यांनी ५१ रूपये चौरस फूटप्रमाणे लेबर चार्ज घ्यावे व बांधकामाचे साहित्य उदासी देईल, असे ठरले. बांधकामाचे अतिरिक्त चार्जेस म्हणून उदासी यांनी एक लाख ८५ हजार ८२५ रूपये पुंडकर यांना दिले. परंतु २३०० फूट बांधकामाचे ५१ रूपयेप्रमाणे एक लाख १७ हजार ३०० रूपये होतात. तसेच सेंट्रींग स्लॅबचे काम उदासी यांच्या अनुपस्थितीत केले. करारनाम्यानुसार, स्लॅब चार ते साडेचार इंच जाडीचे असावे. मात्र प्रत्यक्ष निरीक्षण केल्यावर स्लॅबची गुणवत्ता अतिशय निकृष्ट व केवळ दोन ते तीन इंच जाडीची होती. त्यांनी वेळोवेळी स्बॅल करारनाम्यानुसार व्यवस्थित करण्याची मागणी केली. मात्र पुंडकर यांनी दुर्लक्ष करून करारनाम्याचा भंग केला.
यावर उदासी यांनी अतिरिक्त गेलेले ६८ हजार ५२५ रूपये परत मिळविण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी न्यायमंचात २८ डिसेंबर २००७ रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र विरूद्ध पक्षाच्या वकिलांनी तक्रारकर्ता ग्राहक या संज्ञेत बसत नाही, अशी हरकत घेवून तक्रारच रद्द ठरविली. यावर उदासी यांनी राज्या आयोगाकडे अपील केला. राज्य आयोगाने तक्रारकर्ता ग्राहक असल्याचे सांगून तक्रार पुन्हा नव्याने चालविण्याचे आदेश दिले. सुनावनीच्या प्रत्येक वेळी विरूद्ध पक्षाचे पुंडकर गैरहजर राहत होते.
शेवटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने तक्रारकर्ते उदासी यांची तक्रार मंजूर केली. त्यानुसार विरूद्ध पक्षाने (पुंडकर) यांनी उदासी यांच्याकडून घेतलेल्या एक लाख ८५ हजार ८२५ या रकमेतून प्रत्यक्ष केलेल्या २३०५ चौरस फूट बांधकामाचे ५१ रूपये प्रति चौरस फूटप्रमाणे येणारी एक लाख १७ हजार ३०० रूपये वजा करावी. उर्वरीत ६८ हजार ५२५ रूपये दसादशे १० टक्के व्याजासह तक्रारकर्ते (उदासी) यांना परत करावी. व्याजाची आकारणी २८ डिसेंबर २००७ पासून तक्रारकर्त्याला मिळेपर्यंत करण्यात यावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये द्यावे. शिवाय तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावे व सदर आदेशांचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा न्यायनिवाडा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने केला. (प्रतिनिधी)