कोविड दक्षता समितीच्या सभेत मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:27+5:30
डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात आले आहे.

कोविड दक्षता समितीच्या सभेत मंथन
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्यातील जि.प. डव्वा येथे कोविड दक्षता समितीची सभा गुरूवारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. डव्वा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या परिसरात प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यातबाबत सभेत निर्देश देण्यात आले.
डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात आले आहे. शासकीय अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, तातडीचे वैद्यकीय कारणे, खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोर्स, रुग्ण वाहिका, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे व्यक्ती यांना यातून वगळण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत किराणा दुकान,फार्मसी, कृषी केंद्र, दवाखाना इत्यादी जीवनावश्यक बाबी सोडून बाकी सर्व दुकानें बंद राहतील. तसेच किराणा, कृषी केंद्र हे केवळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. शुक्रवारपासून १४ दिवसापर्यंत आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व शिक्षक मिळून प्रत्यक्ष गृहभेटी देऊन सर्व्हे करणार आहेत. त्यांना सर्व ग्रामवासीयांनी सहकार्य करावे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, जिभेची चव जाणे, नाकाला गंध न समजणे असे लक्षणे असल्यास सांगावे. कुणीही असे लक्षणे असल्यास लपवू नये. तसेच शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक असल्यास घराबाहेर जाताना मास्क अवश्य वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. सभेला खंडविकास अधिकारी प्रकाश निर्वाण, नायब तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.देव चांदेवार, ठाणेदार अनिल कुमरे, सरपंच पुष्पमाला बडोले,उपसरपंच चेतन वडगाये, एफ.आर.टी.शहा, सचिन रहांगडाले, मुख्याध्यापक सिंगनजुडे, तलाठी कमलेश पटले, झामाजी चौधरी, राकेश जैन, विजय गावराने, संगीता कापगते उपस्थित होते.