बोरी आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:38+5:302021-07-28T04:30:38+5:30
अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बोरी (सावरी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र एक वर्षांपासून कुलूपबंद आहे. यामुळे ...

बोरी आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर
अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बोरी (सावरी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र एक वर्षांपासून कुलूपबंद आहे. यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही तर उपोषणाचा इशारा माजी पं.स. सभापती वर्षा घोरमोडे यांनी दिला आहे.
बोरी हे गाव गोंदिया जिल्ह्याच्या टोकावर आहे. या गावानंतर गडचिरोली जिल्ह्याची सुरुवात होते. गाढवी नदीच्या किनाऱ्यावर हे गाव वसले आहे. इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गाढवी नदीला पूर येतो. या गावात व शेतात पुराचे पाणी शिरल्याचा प्रकार प्रत्येक एक-दोन वर्षात घडतो. संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे सावट आहे. आरोग्य यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचे दावे करत असली तरी हे दावे या गावासाठी फोल ठरताना दिसून येत आहेत. मे २०२० पासून या गावात आरोग्य कर्मचारी नाही. नावाला उपकेंद्र आहे मात्र कर्मचाऱ्याअभावी ते कुलूप बंदच असते. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे चित्र विदारक आहे. येथे खोब्रागडे नामक परिचारिका कार्यरत होत्या. त्यांची मे २०२० मध्ये बदली करण्यात आली. दरम्यान एक आरोग्यसेवक होते. मात्र ते महिना- दोन महिन्यातून एखादेवेळी हजेरी लावायचे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांना इतरत्र हलविण्यात आले. प्रतिनियुक्तीवर परिचारिका आहेत खऱ्या मात्र केवळ लसीकरणाला हजेरीपुरते काम असल्याचा आरोप आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीच्या आजारांची भीती आहे. गावातील गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी, सर्दी, ताप, खोकला, कोरोना संसर्ग व इतर संभावित आजारांचा प्रश्न ऐरणीवर आहे. येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर उपोषण आरंभण्याचा इशारा माजी पंचायत समिती सभापती वर्षा घोरमोडे यांनी दिला आहे.
.............
लवकरच परिचारिकेची नियुक्ती
बोरी येथे परिचारिकेचे पद रिक्त आहे. महागाव प्रा. आ. केंद्रातील दुधकवरे नामक परिचारिकेची तात्पुरती प्रतिनियुक्ती केली आहे. मंगळवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावरून बदली झाल्या आहेत. प्राधान्याने बोरी येथे परिचारिका देण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे. जिल्हा बदलीत परिचारिका आली नाही तर ३० जुलै रोजी तालुका स्तरावरील बदल्या आहेत. त्यात बोरी येथे परिचारिका देऊ.
- डॉ. विजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी.
270721\1633-img-20210727-wa0005.jpg
हेच ते बोरीचे कुलुपबंद आरोग्यवर्धिनी उपकेंद्र