बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणातही बोगसपणा
By Admin | Updated: June 7, 2015 01:36 IST2015-06-07T01:36:36+5:302015-06-07T01:36:36+5:30
जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांचे एक-एक नमुने समोर येत आहेत.

बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणातही बोगसपणा
गोंदिया : जिल्ह्यात लघुसिंचन विभागातर्फे करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांचे एक-एक नमुने समोर येत आहेत. अनेक ठिकाणी केलेल्या पाणी साठवण बंधाऱ्यांच्या कामातच निकृष्टपणा नसून हे बंधारे बांधण्यासाठी जे सर्वेक्षणाचे काम झाले त्यातही बोगसपणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
२०११-१२ मध्ये गोंदिया, तिरोडा, सालेकसा, गोरेगाव आणि देवरी या पाच तालुक्यात विविध बंधाऱ्यांच्या कामांसाठी सर्व्हेक्षण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्यासाठी २६ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च दाखविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हे सर्व्हेक्षण कागदावरच करण्यात आले. त्यासाठी काही सर्व्हेक्षण एजन्सींना हाताशी धरून केवळ बिले काढण्यात आली आहेत.
केवळ शासनाचा निधी खर्च केल्याचे दाखविण्यासाठी अनेक ठिकाणी आवश्यकता नसतानाही बंधाऱ्यांचे काम जबरदस्तीने करण्यात आले. यासाठी सर्व्हे करणाऱ्या एजन्सीकडून त्या ठिकाणी बंधाऱ्याची आवश्यकता असल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात झालेले कामही थातूरमातूर करून शासनाच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी करण्यात आली आहे. सर्व्हेक्षण करताना ज्या बाबींची तपासणी करणे गरजेचे आहे त्या तांत्रिक बाबी विचारातच घेण्यात आल्या नाहीत. बंधाऱ्यांच्या कामांची सखोल तपासणी केल्यास ही बाब स्पष्ट होऊ शकते. मात्र गोंदियात चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्णक डोळेझाकपणा करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या कामांमधील हा गैरप्रकार म्हणजे लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या कामांचा एक नमुना आहे. गेल्या दोन-तीन वर्षात झालेल्या आणि आजही होत असलेल्या बहुतांश कामांच्या बाबतीत हाच प्रकार सुरू आहे. वर्ष २०१३-१३ यादरम्यान गोंदियासह भंडारा जिल्ह्यात ही कोट्यवधीची जलसंधारणाची कामे वाटण्यात आली. गोंदियातील लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी-१) यांच्या देखरेखीत झालेल्या या बंधाऱ्यांमध्ये कामांमधील गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत आणि या कामातील गैरप्रकाराला आळा घालावा अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काय असते सर्वेक्षणात?
सर्वेक्षणात संबंधित एजन्सी कोणत्या ठिकाणी बंधारे बांधण्याची गरज आहे, त्या ठिकाणी बंधारा बांधणे योग्य ठरणार की नाही याची तपासणी करते. त्यासाठी टीबीएम, क्रॉस सेक्शन, एल सेक्शन, टीपिकल क्रॉस सेक्शन, ट्रायल पिट्स (जमीन दोन मीटर खोदून आतील माती, मुरूमाचा व दगडाचा थर) आदींची तपासणी केली जाते. या तांत्रिक बाबींमध्ये ती जागा बसत असेल तरच त्या ठिकाणी बंधारा बांधणे योग्य ठरते. मात्र बहुतांश सर्व्हेक्षणात ही सर्व तपासणी थातूरमातूर कागदोपत्रीच दाखविण्यात आली.
ज्या वादग्रस्त बंधाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च दाखविण्यात आला त्या बंधाऱ्यांमध्ये आजघडीला पाणीच नाही. पाणी अडण्यासाठी बंधाऱ्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या प्लेट्स अनेक ठिकाणी लागल्याच नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले तो उद्देशच सार्थकी लागत नसेल तर हे बंधारे कोणत्या कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अशा बिनकामाच्या बंधाऱ्यांचे लोकार्पणही करून कंत्राटदारांची बिले काढण्यात आली आहेत.