बोंडगावदेवी ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:40+5:302021-01-14T04:24:40+5:30
बोंडगावदेवी : येत्या शुक्रवारी (दि.१५) होत असलेल्या बोंडगावदेवी ग्रामपंचायतीची निवडणूक कमालीची रंगणार असून स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ...

बोंडगावदेवी ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची रंगत
बोंडगावदेवी : येत्या शुक्रवारी (दि.१५) होत असलेल्या बोंडगावदेवी ग्रामपंचायतीची निवडणूक कमालीची रंगणार असून स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अंतिम टप्प्यात प्रचाराचा जोर वाढल्याचे चित्र आहे.
सत्ताधारी, विरोधकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून स्थानिक राजकीय आखाड्यात उडी घेतल्याने परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. ४ प्रभागांतील ११ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी पहिल्या प्रथमच जुन्या-जाणत्यांसह नवख्या चेहऱ्यांनी निवडणुकीत सर्व शक्तीनिशी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतल्याने काट्याची लढत होणार आहे. गावाची कमान आपल्या हातामध्ये राहावी सर्वांचे प्रयत्न सुरु आहे. सध्या भाजपसमर्थित सर्वधर्मसमभाव पॅनेल, काँग्रेस आरपीआय समर्थित ग्रामविकास एकता पॅनेल, युवा परिवर्तन पॅनेल सर्व ताकदीनिशी रिंगणात ठामपणे उभे ठाकले आहेत. ग्रामविकास एकता पॅनेल तसेच सर्वधर्मसमभाव पॅनेल चारही वाॅर्डातील ११ जागांवर एकास-एक तोडीचे उमेदवार दिले आहेत. काही वाॅर्डात उमेदवार पळवा-पळवीचेही झाल्याचे प्रकार घडले. प्रारंभी पॅनेलकडून उमेदवारी अर्ज भरूनसुद्धा शेवटच्या क्षणी बाहेर फेकून दिल्याने काहींना स्वतंत्रपणे निवडणूक लढावी लागत आहे. हट्टापायी संघटितपणाला सुरुंग लावण्याचा प्रकारसुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पॅनेल संयोजकांनी आपल्या उमेदवारांचा हायटेक प्रचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. उमेदवारांच्या प्रचारशैलीवरून काहींना सरपंचपदाचे डोहाळे लागलेले दिसत आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार सर्वतोपरी सर्व आयुधांचा वापर करत आहे.
महिला उमेदवार सर्वाधिक
ग्रामपंचायत निवडणुकीत ११ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये १७ महिला तर १३ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. पॅनेलचा सहारा न घेताही महिला उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली हे विशेष.