भाजपातील असंतुष्ट राष्ट्रवादीच्या गळाला
By Admin | Updated: March 13, 2015 01:50 IST2015-03-13T01:50:18+5:302015-03-13T01:50:18+5:30
भारतीय जनता पक्षातील वर्चस्वाची लढाई आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे ...

भाजपातील असंतुष्ट राष्ट्रवादीच्या गळाला
आमगाव : भारतीय जनता पक्षातील वर्चस्वाची लढाई आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे कारण पुढे करीत भाजपातील आमगावचा असंतुष्ट गट व त्यांचे नेते भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल होत आहे. त्यासाठी येत्या २२ मार्चचा मुहूर्त ठरल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या भागात पक्षाला सत्ता नसतानाही सामान्य कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून पक्षाकरीता अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. अश्यात मिळालेल्या सत्तेची भागीदारी कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्वांना समान संधी देत सत्ता गाजविण्याकरीता पुढे केले. परंतु सत्तेत कायमचा वरदहस्त निर्माण करण्यासाठी वर्चस्वाची लढाई सुरू झाली. त्यामुळे भाजपात बंडखोरीला उधाण आले व पक्षात भाजप विरुद्ध शिवणकर गट असे चित्र निर्माण झाले.
माजी मंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांनी पूर्व विदर्भात सत्ता सहभागात मोठा संघर्ष निर्माण केला. त्यांनी पाच वेळा विधानसभा तर दोन वेळा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. युती शासनात त्यांनी मंत्रीपद व राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्षपद हाताळले. परंतु राजकारणात स्वत:चे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाण्यात पाहीले. गेल्या एक दशकापासून गडकरीविरुद्ध शिवणकर असे चित्र कायम आहे. त्यामुळे पक्षात शिवणकर मुख्य धारेपासून दुरावले गेले. त्यांचा राजकीय वारसा सांभाळणारे विजय शिवणकर यांनाही पक्षातील विरोधाभासाला बळी पडावे लागले.
शिवणकरांवर मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवल्यने परिस्थिती विकोपाला गेली. यात पक्षाला संघटन बळावर यश मिळाले. परंतु गोंदिया विधानसभा निवडणुकीत अंतर्गत बंडाळीमुळे फटका बसला. पक्षशिस्त घडविण्यासाठी पक्षाने समन्वय घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिष्ठा जपत शिवणकर गटाने दि. १ फेब्रुवारीला शक्तिप्रदर्शन करुन बंड पुकारले. याच वेळी मुख्य ठिणगी पडून पुढाऱ्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तंबूत जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे.
आमगाव येथे दि.११ मार्चला सरस्वती विद्यालय येथे भाजप बंडखोर व राष्ट्रवादींच्या पुढाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर व राष्ट्रवादीचे नेते नरेश माहेश्वरी यांनी मार्गदर्शन केले. येत्या २२ मार्चला राष्ट्रवादी नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत विजय शिवमकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्याचे यावेळी निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजपच्या जि.प. सदस्य संगीता दोनोडे, तुंडीलाल कटरे, पं.स. सदस्य रज्जू भक्तवर्ती व नरेंद्र शिवणकर, तिरथ येटरे, याशिवाय राष्ट्रवादीचे कमल बहेकार आदी पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)