आमसभेअभावी विकासकामांना खीळ
By Admin | Updated: July 27, 2016 02:09 IST2016-07-27T02:09:36+5:302016-07-27T02:09:36+5:30
जानेवारी महिन्यात झालेल्या आमसभेनंतर आता सात महिन्यांच्या काळात नगर परिषदेची आमसभा झालीच नाही.

आमसभेअभावी विकासकामांना खीळ
सात महिन्यांत एकच आमसभा : या महिन्यात मुहूर्त नाहीच
गोंदिया : जानेवारी महिन्यात झालेल्या आमसभेनंतर आता सात महिन्यांच्या काळात नगर परिषदेची आमसभा झालीच नाही. आमसभा न झाल्यामुळे कित्येक विकासकामे सभेच्या मंजूरी अभावी अडकून पडली आहेत. याचा परिणाम मात्र शहराच्या विकासावर होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आमसभेकडे लागल्या आहेत.
नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अन्वये पालिकेची आमसभा दर दोन महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. गोंदिया नगर परिषदेत मात्र यावर्षात जानेवारी महिन्यात आमसभा झाली असून त्यानंतर आतापर्यंत आमसभा घेण्यात आलेली नाही.
पाच लाखांच्या आतील धोरणात्मक किंवा वित्तीय कामासाठी स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. तर पाच लाखांच्यावरील धोरणात्मक किंवा वित्तीय कामासाठी आमसभेची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेला दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र आमसभा झाली नसल्याने नगर परिषदेसह सदस्यांची सुमारे ५० च्यावर कामे मंजूरीसाठी अडकून पडली आहेत.
नगराध्यक्षांना वेळेवर आमसभा घेता यावी यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून त्यांना सुचीत केले जाते. त्यानुसार नगराध्यक्षांना प्रशासनाकडून चार-पाच वेळा सुचीत करण्यात आले आहे. शिवाय एकदा जिल्हाधिकाऱ्यांनाही सुचीत करण्यात आले आहे. मात्र अद्याप आमसभेचा मुर्हूत काही निघालेला नाही. (शहर प्रतिनिधी)