बिजेपार-मरामजोब रस्ता झाला चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:54+5:30
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने मालसुतो अभियान राबवित आहेत. त्यामुळेच आजघडीला बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता चिखलमय रस्ता म्हणून ओळखला जातो.

बिजेपार-मरामजोब रस्ता झाला चिखलमय
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता उखडल्याने चिखलमय झाला आहे. या मार्गावरील बिजेपार, पांढरवाणी, डोमाटोला, बिजाकुटूंब, मरामजोब या गावातील नागरिकांना चिखलाने भरलेल्या खड्यांतून मार्ग काढावा लागत आहे.
तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने मालसुतो अभियान राबवित आहेत. त्यामुळेच आजघडीला बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता चिखलमय रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता चिखलाने माखलेला आहे.
या रस्त्यावर बिजेपार, पांढरवाणी, डोमाटोला, बिजाकुटूंब, मरामजोब यासह अनेक गावे आहेत. हा क्षेत्र कारूटोला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मोडतो. मात्र, या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर आदिवासी बहुल आहे. त्यातच या क्षेत्राला मागील १५ वर्षांपासून आदिवासी समाजाचा आमदार लाभत आहे. असे असतानाही या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने विकासाची अपेक्षा कुणाकडून करावी? असा सवाल आदिवासी बांधवांकडून केला जात आहे.
मी माझ्या कार्यकाळात या रस्त्याच्या विकासासाठी पाठपुरावा केलेला आहे. तसेच नियोजनात सुद्धा टाकलेला असून यासंदर्भात क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्याशी बोलणे झाले आहे. हा रस्ता लवकरात लवकर कसा बनवता येईल, याकडे आमचे लक्ष आहे.
- लता दोनोडे
माजी जि.प.सदस्य, कारूटोला क्षेत्र
ही गावे विकास कामाच्या दृष्टिकोनातून कोसोदूर आहेत. या गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माजी जि.प.सदस्यांनी या गावांचा विकास करण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या आदिवासी गावांचा विकास न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
- देवराम चुटे
सामाजिक कार्यकर्ता, साकरीटोला