घाणीमुळे बीजीडब्ल्यू रुग्णालयच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:01 IST2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:12+5:30
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने शासन आणि प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पानठेले,तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाला लोकमत प्रतिनिधीनी भेट दिली असता शासनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे आढळले.

घाणीमुळे बीजीडब्ल्यू रुग्णालयच आजारी
अंकुश गुंडावार/नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरगरीबांसाठी असलेल्या येथील एकमेव बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला(बीजीडब्ल्यू) घाणीचा विळखा असून याकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक केली असल्याने येथे उपचारासाठी येणारे रुग्ण बरे होऊन परतण्याऐवजी आजारी होण्याची शक्यता बळावली आहे. रुग्णालय परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे हे रुग्णालयाच आजारी पडले असून यावर उपचार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने शासन आणि प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पानठेले,तंबाखू विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाला लोकमत प्रतिनिधीनी भेट दिली असता शासनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे आढळले.
रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचे नातेवाईक खर्रा खाऊन रूग्णालयाच्या भिंतीवर पिचकाऱ्या मारीत असल्याने या रुग्णालयाच्या भिंतीचे कोपरे पिचकाऱ्यांनी चांगलेच रंगलेले असल्याचे आढळले. शिवाय यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांना दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले, मात्र हा आदेश बीजीडब्ल्यू रुग्णालयात येणाºयासाठी लागू होत नसल्याचे चित्र रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर लक्षात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मात्र रुग्णालयात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली गर्दी पाहून फिजिकल डिस्टन्सिंगचा सुध्दा फज्जा उडविला जात असल्याचे पाहयला मिळाले. रुग्णालयाच्या परिसरात आणि आतील आवारात सर्रासपणे डुकरांचा वावर दिसून आला. तर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे चित्र पाहयला मिळाले.
हा सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या आणि येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लक्षात येऊन देखील ते यावर उपाययोजना करण्याऐवजी डोळेझाक करीत असल्याने या समस्येत अधिक वाढ झाली आहे.
एकंदरीत रुग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे येथे उपचार घेवून बरे होण्यासाठी येणारे अधिक आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्षमता २०० खाटांची उपलब्ध केवळ १८५
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने येथे बीजीडब्ल्यू रुग्णालय सुरु केले. रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९३९ मध्ये करण्यात आले. एकूण २०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. तर यातील २० टक्के खाटा सध्या कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया गर्भवती महिलांना येथील डॉक्टर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी याप्रकारावर संताप व्यक्त केला.