गोंदिया : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर मातेला बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. हा लाभ वेळेत देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयातून हा लाभ संबंधित पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजनासंदर्भात आयोजित जिल्हास्तरीय सुकाणू व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अपर जिल्हा अधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तुरकर, आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर, डीपीएम वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक हिम्मत मेश्राम, जिल्हा समन्वयक खांडेकर यांच्यासह विविध तालुक्यांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण उपस्थित होते.
पुढे बोलताना मीना यांनी, ठरवून दिलेले उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महसूल, आरोग्य, बँक आणि डाक विभागांनी आपापसात समन्वय ठेवून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात असून, सद्यपरिस्थितीत ग्रामीण भागात समाधानकारक काम असल्याने संबंधित विभागातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील यावेळी त्यांनी केले. शहरी भागातील कॉर्रेकशन क्यू ताबडतोब निकाली काढण्याचे आदेश संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
विर्दर्भात कोरोना रुग्ण वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच वाढता संसर्ग रोखण्याकरिता चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे प्रत्येक बाधित व्यक्तीच्या मागे किमान २० व्यक्तींची तपासणी करावी. सर्व आरोग्य केंद्र आणि त्यांच्या उपकेंद्रात देखील पल्स ऑक्सिमीटर यंत्र सामग्री, बेड्स, ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरुन बाधित व्यक्तीला त्वरित उपचार मिळण्यास मदत होईल. भाजीमंडी व सर्व दुकानदारांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर, अनावश्यक गर्दी टाळणे आदी नियमांचे कटाक्षाने पालन करावे. तसेच सर्व जिल्हा व तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर (CCC) कोविड-१९ च्या अनुषंगाने उपलब्ध झालेली साधनसामग्री व व्हेंटिलेटर्स सुस्थितीत असल्याची खात्री करावी, अशा सूचना देखील संबंधितांना दिल्या. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने जनतेने अधिक खबरदारीपूर्वक सर्व प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.