सौंदर्य आहे, सौंदर्यीकरणाचा अभाव
By Admin | Updated: July 12, 2014 23:43 IST2014-07-12T23:43:17+5:302014-07-12T23:43:17+5:30
बाकटी गावात सौंदर्यीकरणासाठी बराच वाव आहे. शाळा, देऊळबोडीच्या सौंदर्यीकरणाची ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केली जाते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या गावची स्थिती जैसे थे आहे.

सौंदर्य आहे, सौंदर्यीकरणाचा अभाव
दत्तक ग्राम योजना : गावात विकास कामे झालीच नाही
संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव
बाकटी गावात सौंदर्यीकरणासाठी बराच वाव आहे. शाळा, देऊळबोडीच्या सौंदर्यीकरणाची ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केली जाते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या गावची स्थिती जैसे थे आहे. दत्तक ग्राम योजनेनंतरही ग्रामविकासात कसलेच परिवर्तन दिसून येत नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आ.राजकुमार बडोले यांनी बाकटी या गावाला दत्तक घेतले. या गावची लोकसंख्या १९०६ आहे. या गावात २७१ कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत. हे गाव निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कारप्राप्त आहे. मात्र क्षुल्लक कारणावरुन उद्भवणारे वादविवाद हे नित्याचे आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काहीशा प्रमाणात कामे झाली असली तरी अद्यापही वर्षातून प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला किमान १०० दिवस रोजगार देण्यात हे गाव यशस्वी होऊ शकले नाही. या गावातील मुख्य व्यवसाय शेती व मजूरी आहे. या गावातील सुमारे ५० कुटुंब तेंदूपत्ता हंगामात रोजगारासाठी स्थलांतर करतात. विहिरी, हातपंप व नळयोजना अस्तित्वात आहे. तरीसुद्धा उन्हाळ्यात अंशत: नळयोजनेचे पाणी दररोज उपलब्ध होत नाही.
तालुक्यातील या मार्गावर मोठी गावे असली तरी अद्यापही या गावांची तालुका मुख्यालयाशी वाहतुकीच्या दृष्टीने नाळ जुळलेली नाही. मानव संसाधन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेनिमित्ताने बस सुविधा उपलब्ध आहे. या गावातील शेतजमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली आहे. प्रामाणिक प्रयत्न झाल्यास येथे सिंचन सुविधा उपलब्ध करण्यास मुळीच अडचण नाही. वन जमिनीवरील केवळ सहा अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले. अद्यापही मोठ्या प्रमाणावर गावकरी पट्टे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या साडेचार वर्षात बौद्ध विहारासाठी सुरक्षा भिंत व चावडी बांधकाम एवढीच कामे आमदार निधीतून झाली असल्याची माहिती उपसरपंचांनी दिली.
या गावात सरपंचांचे पद रिक्त आहे.
उपसरपंचांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आ. बडोले हे गावात केवळ कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात. आतापर्यंत ते ३ ते ४ वेळेला आले. दत्तक गावाच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण कामे या गावात झाली नाही. नेहमीप्रमाणे जशी साधारण विकासकामे होतात तशीच कामे झाली. ग्रामपंचायततर्फे सुचविण्यात आलेल्या विकासकामांकडे आमदारांनी लक्ष दिले पाहिजे. याशिवाय दत्तक ग्राम योजनेच्या सभेत सुचविण्यात आलेली कामे अद्यापही प्रलंबित आहेत. त्या कामांना प्राधान्यक्रम दिले पाहिजे. नवेगावबांध, दिघोरी मोठी, अड्याळ या मार्गावर वाहतूक सुविधा, छगन मांढरे ते पाण्याची टाकीपर्यंत ७०० मीटर रस्त्याचे बांधकाम, बाजार चौक व शामराव वडगाये यांच्या घरासमोर हातपंप, गावसीमेवर स्वागतद्वार व बाकटी येथे पोलीस चौकी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदारांच्या दत्तक ग्राम सभेत गावविकासाच्या दृष्टीने आठ समस्या मांडण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळेला आवारभिंतीची मागणी होती. ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. शाळेला ताराचे कुंपण आहे. दर्शनी भागात आवारभिंत आहे. शाळेच्या मागील भागात क्रीडांगणात आवारभिंत आहे. शाळेच्या मागील भागात क्रीडांगणात आवारभिंत नाही. सांस्कृतिक भवनाचे काम खासदार निधीतून सुरू आहे. ग्रा. पं.च्या वतीने जनसुविधा योजनेतून स्मशान शेड व विंधन विहिरीचे बांधकाम सुरू आहे. वॉर्ड क्र. ३ मधील बारकू बोरकर यांचे घराजवळील विहिरीचे पुनर्निर्माण काम अद्यापही झालेले नाही. ग्रामपंचायतनजीकच्या देऊळबोडी येथे पाणघाटाची प्रमुख मागणी होती. ही साडेचार वर्षात कार्यान्वित होऊ शकली नाही. साकोली ते अर्जुनी/मोरगाव मार्गे गुढरी, बाकटी, चान्ना, सोमलपूर या एसटीच्या दोन फेरीमध्ये मागणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांसाठी म्हणून गावात बस येते. जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने बससेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे मात्र निकाली काढण्यात आली. एकंदरित दत्तक ग्राम योजनेच्या दृष्टीने या गावात विकासकामे झालीच नसल्याचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.