तिरोड्याच्या शिंगाडा तलावात सौंदर्यीकरण
By Admin | Updated: January 12, 2015 22:52 IST2015-01-12T22:52:48+5:302015-01-12T22:52:48+5:30
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आता लवकरच पाऊल पुढे उचलले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली

तिरोड्याच्या शिंगाडा तलावात सौंदर्यीकरण
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आता लवकरच पाऊल पुढे उचलले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून राज्य शासनाने सदर कामाच्या खर्चासाठी ५० लाख रूपये मंजूर केले आहेत.
काही वर्षांपूर्वी तिरोड्याच्या सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविण्यात आले होते. या प्रस्तावाला शासकीय निर्णयांतर्गत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी देत ५० लाख रूपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. तिरोडा शहराचे महत्त्व आता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळच अदानी पॉवर प्लाँट सुरू झाल्याने तिरोड्याच्या विकासाची दिशा स्पष्ट दिसून येत आहे. परंतु शहरात तसेच जवळील परिसरात मनोरंजनाचे कोणतेही विशेष साधन उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त होते.
ही बाब हेरून नगर परिषदेने सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाची योजना तयार केली. या योजनेंतर्गत तेथील बालकांसाठी सुंदर उद्यानाची उभारणी होईल. एवढेच नव्हे तर तलावात नौकाविहार सुरू केले जाईल. याचा उपयोग विशेष करून बालकांना होईल. संपूर्ण कुटुंबासह बालके याचा लाभ घेवू शकतील.
राज्य शासनाने सन २००६-०७ पासून राज्य सरोवर संवर्धन योजना सुरू केली. आता याच योजनेतून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून तलावाच्या पाण्यातून प्रदूषणाचे स्त्रोत शोधून त्याची वाढ थांबविणे, तलावात जमा झालेली माती काढणे, तलावाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी निरूपयोगी वनस्पती नष्ट करणे, जैविक प्रक्रियेतून पाण्याच्या गुणवत्तेत सुधार करणे, तलावाच्या तटाचे सौंदर्यीकरण, हिरवळ पट्टा विकसित करणे, कंपाऊंड करणे, बालोद्यान सुरू करणे, नौका विहार व स्वच्छता गृह निर्माण करण्याकरिता सदर रक्कम मंजूर करण्यात येते. परंतु ही रक्कम मिळवून घेण्यासाठी व काम पुढे वाढविण्यासाठी राज्य शासनाने नगर परिषदेवर काही अटी व नियम लादले आहेत. या अटींची पूर्तता केल्यावरच काम पुढे वाढू शकेल.
आता या तलावाबाबत तिरोडावासीयांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे दिसते. (प्रतिनिधी)