गावकऱ्यांनो ‘लय भारी’ व्हा!
By Admin | Updated: December 19, 2015 01:51 IST2015-12-19T01:51:46+5:302015-12-19T01:51:46+5:30
संपूर्ण राज्यात समुदाय स्वच्छता कॉर्डाची संकल्पना राबविण्यात येत आहे. शौचालय असलेल्या व त्याचा वापर करणाऱ्या ...

गावकऱ्यांनो ‘लय भारी’ व्हा!
प्रीती रामटेके : चिखली येथे समुदाय स्वच्छता कार्ड उपक्रमाचा शुभारंभ
गोंदिया : संपूर्ण राज्यात समुदाय स्वच्छता कॉर्डाची संकल्पना राबविण्यात येत आहे. शौचालय असलेल्या व त्याचा वापर करणाऱ्या घरांवर हिरव्या रंगाचा ‘लय भारी’ हा कार्ड लावण्यात येत आहे. घरात शौचालय बनवून, त्याचा वापर करून गावकऱ्यांनी ‘लय भारी’ व्हा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या प्रीती रामटेके यांनी केले.
तालुक्यातील ‘ आमदार आदर्श गाव चिखली’ येथे समुदाय स्वच्छता कार्ड लावण्याच्या मोहिमेचा गुरुवारला शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी चिखलीचे सरपंच कैलास पटले, उपसरपंच दिलीप क्षीरसागर, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस. मानकर, विस्तार अधिकारी सी.एच. गौतम, ग्रामसेवक गिरीष भेलावे, ग्रामपंचायत सदस्य कुलपत रहांगडाले, भूमेश्वर पटले, सरिता तांडेकर, कल्पना हरिणखेडे, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद गोंदियाचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यावेळी उपस्थित होते.
शौचालय घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचा आहे. वृद्ध मातापित्यांसाठी जसा तो सोयीचा आहे, तसाचा महिलांच्या लज्जा रक्षणसाठी सुद्धा त्याची गरज आहे. शिवाय प्रत्येक घरात शौचालय बनले तर संपूर्ण गाव हागणदारीमुक्त होवून अनेक संभाव्य आजारापासून गावकऱ्यांचा बचाव होवू शकतो. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीने शौचालय बनवून आपले गाव आदर्श करावे असे आवाहन याप्रसंगी गटविकास अधिकारी एच.एस. मानकर यांनी केले. समुदाया स्वच्छता कार्डाची संकल्पना वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ठ तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीत राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे समुदाय स्वच्छता प्रगती पत्रक सार्वजनिक ठिकाणात प्रदर्शीत करुन गावातील शौचालय बांधकामाबाबतची एकूणच स्थिती संपूर्ण गावकऱ्यांना कळणार आहे. हा उपक्रम गावकऱ्यांच्या हिताचाच आहे. शिवाय या उपक्रमासह गावात स्वच्छता जागरण मंचाची सुद्धा स्थापना करावयाची आहे. २० कुटुंबामागे एक सक्रिय सदस्य नेमूण गावात वैयक्तिक शौचालय बांधकामाला गती आणावयाची आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे मत पंचायत समिती विस्तार अधिकारी सी.एच. गौतम यांनी व्यक्त केले. गावाला हागणदारीमुक्त करण्यासह आपला गाव आदर्श करण्यासाठी सर्वतोपरि सहकार्य करण्याची ग्वाही याप्रसंगी सरपंच कैलास पटले यांनी दिली. माहिती, शिक्षण संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक गिरीश भेलावे यांनी केले. दरम्यान गावात फेरी काढून स्वच्छता समूदाय कार्ड लावून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
चिखली येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का बडवाईक, शिक्षक एल.डी. पटले, अंगणवाडी सेविका गिता रहांगडाले, निशा रहांगडाले, सुधाकर पटले, पुरण पटले, रेवन रंगारी, प्रमिला रहांगडाले, दिलीप भरणे, गटसंसाधन केंद्राचे तालुका समन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक अनुप रंगारी, सुरेश पटले, छाया बोरकर तथा गावकरी कार्ड लावण्याच्या उपक्रमात सहभागी झाले.(प्रतिनिधी)