काळाबाजार थांबविण्यासाठी सज्ज रहावे
By Admin | Updated: June 26, 2014 23:23 IST2014-06-26T23:23:17+5:302014-06-26T23:23:17+5:30
खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर

काळाबाजार थांबविण्यासाठी सज्ज रहावे
शिवणकर यांचे निर्देश : कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा
गोंदिया : खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर आळा घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिले आहे.
खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला घेऊन जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्यस्तरीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीत कृषी विभागाचा आढावा घेत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान बैठकीत खरीप हंगामासाठी महाबीज व खासगी विक्रेत्यांकडून २३ जूनपर्यंत ३१ हजार ४११ क्विंटल बियाणे विक्री झाले असल्याचे माहिती दिली. सध्या जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा नाही, असेही सांगण्यात आले. ८० टक्के बियाण्यांची विक्री झालेली आहे. त्यातही कसलीही तक्रार आलेली नाही. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीस आलेले नाही, असाही विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खताच्या बाबतीत आढावा सादर करताना त्यांनी सांगितले की, युरिया खतास ४४ हजार क्विंटलची मंजुरी मिळाली आहे. २३ जूनपर्यंत ९ हजार १०० क्विंटल खताचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजार २४७ क्विंटल खताचा साठा असून, जून अखेरपर्यंत १४ हजार क्विंटल युरिया खताची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी दोन हजार ५०० क्विंटल युरिया खत प्राप्त झाले आहे. १२ हजार क्विंटल युरिया खताची कमतरता भासणार आहे. येत्या दोन दिवसांत ५ हजार २०० क्विंटल युरिया पुन्हा जिल्ह्याला पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आढावा घेत असताना जिल्ह्यात खत व बियाण्यांच्या काळाबाजारावरदेखील चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकदा शेतकऱ्यांची लूट केली जाते. खत काळ्याबाजारात विक्री केले जाते, अशा तक्रारी प्राप्त होत असतात. त्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन सबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी विभागाने सज्ज राहावे, असे निर्देशही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवणकर यांनी दिलेत. विभागाने खत व बियाण्यांच्या तक्रारीकडे जातीने लक्ष द्यावे, निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)