सावधान ! कोरोना रुग्ण वाढीचा दर दुप्पटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:06+5:30

आरोग्य विभाग, नगर परिषद केवळ आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्षात उपाययोजना राबविण्याकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आरोग्य विभागात डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास विलंब होत आहे.

Be careful! Corona patient growth rate doubles | सावधान ! कोरोना रुग्ण वाढीचा दर दुप्पटीवर

सावधान ! कोरोना रुग्ण वाढीचा दर दुप्पटीवर

ठळक मुद्दे८१ नवीन बाधितांची भर : सर्वाधिक ६४ रुग्ण गोंदिया शहरातील : आतापर्यंत १३१० बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हावासीयांनो सावधान... जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने वाढत असून मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्ण वाढीचा दर डब्लिंग झाला आहे. त्यातच गोंदिया शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शहरवासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शुक्रवारी (दि.२८) जिल्ह्यात ८१ कोरोना बाधितांची भर पडली असून यात सर्वाधिक ६४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या एकूण ८१ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६४, गोरेगाव १, आमगाव ३, सडक अर्जुनी ३, सालेकसा ३, देवरी २, नवेगावबांध २ आणि तिरोडा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील आहे. तर गोंदिया शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दररोज ५० हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.
शहरातील बहुतेक भागात आता कोरोनाचा शिरकाव झाला असून काही मोजकाच भाग आता शिल्लक आहे. मात्र ज्या झपाट्याने संसर्ग वाढत आहे तो पाहता संपूर्ण शहरच कोरोनाच्या विळख्यात येण्यास वेळ लागणार नाही. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पूर्णपणे अभाव आहे.
आरोग्य विभाग, नगर परिषद केवळ आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्षात उपाययोजना राबविण्याकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आरोग्य विभागात डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास विलंब होत आहे.
एकंदरीत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाव वाढत असताना नागरिकांनी मी माझा रक्षक हे सूत्र आत्मसात करुन स्वत:ची आणि कुुटुंबीयांची काळजी घ्यावी. आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

मेडिकलच्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून अनेक शासकीय कार्यालयात सुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातून आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) डॉक्टर सुध्दा वंचित राहिले नसून मेडिकलच्या चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी दररोज जिल्ह्याचे दौरे करीत आहेत. मात्र यानंतर त्यांच्या वाहनांचे सॅनिटायझेशन केले जात नसल्याची माहिती आहे.

२८ दिवसात वाढले १०२० रुग्ण
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास तीन महिने जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै दरम्यान जिल्ह्यात केवळ २८८ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. तर १ ते २८ ऑगस्ट दरम्यान तब्बल १०२० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. तर कोरोना बळींच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. शुक्रवारी आमगाव तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १५ हजार ६२५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. यापैकी १३ हजार ९१२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १३११ नमुने आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहे. २८८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलबिंत आहे. तर ४५२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे.

Web Title: Be careful! Corona patient growth rate doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.