धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले झळके

By Admin | Updated: August 10, 2014 23:04 IST2014-08-10T23:04:31+5:302014-08-10T23:04:31+5:30

दोन वर्षापूर्वी म्हणजे १८ जून २०१२ रोजी गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणाऱ्या डॉ.दिलीप झळके यांची बदली नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे.

Be brave decision makers | धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले झळके

धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व ठरले झळके

नरेश रहिले - गोंदिया
दोन वर्षापूर्वी म्हणजे १८ जून २०१२ रोजी गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळणाऱ्या डॉ.दिलीप झळके यांची बदली नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे. जिल्ह्यातील त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेऊन त्यांनी अटीतटीची परिस्थिती आटोक्यात आणली. जिल्ह्यात कायदा व सुवस्था बिघडू न देता त्यावर मात करीत गंभीर प्रकरणांना धैर्याने सांभाळले. राजकारण्यांच्या दबावाला न जुमानता त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले.
जिल्ह्याच्या इतिहासात नववे पोलीस अधीक्षक ठरलेल्या डॉ. झळके यांनी यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम केल्यामुळे त्यांना गोंदिया जिल्ह्यातील नक्षल हालचालींवर करडी नजर ठेवता आली. नक्षलवाद्यांचे कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यात त्यांना यश आले. सालेकसा तालुक्यातील दोन इसमांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केले होते. त्यावेळी पोलिसांनी आपले प्राण पणाला लावून त्या दोघांना सकुशल घरी आणले. छत्तीसगडमधील दोन हजारांवर विद्यार्थी, युवक त्यांच्या आंदोलनाचा भाग म्हणून तत्कालीन नागरी उड्डानमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर हल्लाबोल करण्यासाठी आले होते. त्यावेळी परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत होती. परंतु ५०० जणांना वेळीच थोपवून हे प्रकरण शांत करण्यात त्यांना यश आले.
शासनाने नक्षलग्रस्त भागासाठी नियुक्ती केली तरी पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी गोंदियासारख्या जिल्ह्यात काम करण्यास नकार देतात. गोंदिया जिल्ह्यात बदली होऊनही तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर राहिलेल्या १७ पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्याचे धाडस झळके यांनी दाखविले. त्यावेळी त्यांच्यावर महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा दबाव आला होता. परंतु त्यांनी त्या दबावाला बळी न पडता निर्णय शासनाचा आहे, मी केवळ अंमलबजावणी करणारा आहे असे नेत्यांना सांगितले.
पांढराबोडी येथील अंगणवाडी सेविकेवरील बलात्कार आणि खून प्रकरणात संपूर्ण पोलीस विभाग संकटात आला होता. मात्र दोन दिवसांच्या आतच हा गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यशवंत गेडाम यांना मारहाण झाली. त्यावेळीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु हे ही प्रकरण शांत झाले. शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या सुरक्षा कठड्याला एका ट्रकने धडक दिली होती. त्यावेळी परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. परंतु समन्वय घडवून प्रकरण शांत करण्यात आले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शास्त्री वॉर्डात एका नवविवाहितेवर पाच नराधमांनी तिच्या पतीसमोर बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश आले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या कवलेवाडा प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रकार झाल्याने हे प्रकरण चिघळून दुसरे खैरलांजी प्रकरण होऊ पाहात होते. परंतु या प्रकरणातील तथ्य पुढे आणून पोलिसांनी अतिशय संयमीपणे वागत प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न हाणून पाडला. गुन्हेविषयक घडामोडींना वेळीच उघडकीस आणण्यातही झळके यशस्वी राहिले. त्यांच्या काळात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया झाल्या नाही. मात्र त्यांनी नक्षलवाद्यांच्या कमांडरसह नक्षलवाद्यांना व नक्षलसमर्थक अशा १४ जणांना आपल्या कार्यकाळात अटक केली. नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोटासाठी पेरून ठेवलेली स्फोटकं बाहेर काढली.
पोलीस प्रशासनात काम करताना शिस्त, गस्त व बंदोबस्त यात कुचराई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आ.रामरतन राऊत यांच्या सुरक्षेसाठी लावलेले पोलीस ड्युटीवर न गेल्यामुळे दोन पोलिसांना त्यांनी निलंबित केले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यानुसार त्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाची पध्दती राबविली. गोंदिया नक्षलग्रस्त आहे. येथे मनुष्यबळाची कमतरता आहे. यासाठी त्यांनी ४८० नवीन जागा भरण्याची मागणी रेटून धरली.
ही मागणी पुर्ण करण्याचे पत्र शासनाने त्यांना नुकतेच पाठविले आहे. त्यांनी पोलीस मुख्यालयात अनेक वृक्षांची लागवड केली. त्यातून जंगल भागात नक्षल्यांशी प्रत्यक्ष लढा देण्याचा सराव पोलीसांना येथे करता येणार आहे. त्यांच्या या वृक्षावरील प्रेमामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना वृक्षमित्र पुरस्काराने गौरविले. सन २००४ पासून तयार होत असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण केले. इमारत शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीला उजाळा देत त्या इमारतीचे उद्घाटनही केले.

Web Title: Be brave decision makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.