बार्टीचे उपकेंद्र चालना देणार
By Admin | Updated: September 17, 2015 02:10 IST2015-09-17T02:10:28+5:302015-09-17T02:10:28+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीने उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार ....

बार्टीचे उपकेंद्र चालना देणार
पालकमंत्री बडोले यांचे प्रतिपादन : सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीने उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार असल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच स्वावलंबी करण्यात येईल. त्यामुळे निश्चितच विकासास चालना मिळेल असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
गोंदिया येथील मरारटोली भागातील नगर परिषद शाळेच्या परिसरात नागरी दलित सुधार योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, भाजपा शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, नंदकुमार बिसेन, नगरसेवक शोभा चौधरी, जितेंद्र पंचबुध्दे, राहुल यादव, महेंद्र उके, शिव शर्मा, प्रतिष्ठीत नागरिक उमराव गडपायले, भाऊराव उके, हरी चौधरी व प्रदिपसिंह ठाकुर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोंदिया नगर परिषदेला १७ कोटी रुपये देण्यात आल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले. गोंदिया शहरातील रमाई घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांचे कामे वेगाने सुरू आहे. गोंदिया नगर पालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यामुळे विकासाच्या बाबतीत गोंदियाचा कायापालट झाल्याचे दिसून येईल असेही म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेली लंडन येथील वास्तु खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. १२ वर्षापासून प्रलंबित असलेला इंदू मिलच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गोंदिया येथे राजस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त १ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या निधीतून हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना याचा उपयोग होणार आहे. प्रास्ताविक नगरसेवक घनश्याम पानतावणे यांनी, संचालन जयंत शुक्ला यांनी तर आभार नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ यांनी मानले.
यावेळी मरारटोली परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)