बापू, तुम्हीच खरं सांगा...
By Admin | Updated: July 19, 2015 01:29 IST2015-07-19T01:29:45+5:302015-07-19T01:29:45+5:30
गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे.

बापू, तुम्हीच खरं सांगा...
गोंदिया जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेत झालेली काँग्रेस-भाजप युती सध्या जिल्ह्यातच नाही तर राज्यातील एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अतिशय गांभिर्याने घेतलेल्या या विषयात आता काय होणार, अशी उत्सुकता जशी सर्वत्र निर्माण झालेली आहे तशीच या घडामोडी घडवून आणण्यासाठी कोणी-कोणी पुढाकार घेतला याचाही शोध पक्षातर्फे घेतला जात आहे. त्यामुळे या विषयात पुढे काय व्हायचे ते होवो, तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विषय आहे. पण ज्या काही घडामोडी या निमित्ताने घडत गेल्या त्यातील एकेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत.
आमगाव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान भाजप आमदार संजय पुराम यांच्या पत्नी सविता पुराम आणि काँग्रेसचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांची कन्या सुषमा राऊत या दोघींनाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे भाजपच्या सविता पुराम यांना काँग्रेसच्या उषा शहारे यांनी तर काँग्रेसच्या सुषमा राऊत यांना भाजपच्या सरिता रहांगडाले यांनी पराभवाची धूळ चाखली. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या दोन्ही लक्षवेधी लढतींमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढाई झाली. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेत सभापतीपदी विराजमान असणाऱ्या सविताताईंसाठी त्यांचे पतीदेव आ. संजय पुराम यांनी काँग्रेस उमेदवाराविरूद्ध निवडणूक प्रचारादरम्यान केलेली आगपाखड तेथील मतदारांच्या चांगलीच ध्यानीमनी आहे, एवढेच नाही, तर माजी आमदार रामरतनबापू राऊत यांनी आपल्या कन्येला निवडून देण्याचे आवाहन करताना भाजप उमेदवाराविरूद्ध केलेला प्रचारही मतदारराजा विसरलेला नाही.
निवडणुकीतील ही लढाई व्यक्तीविरूद्धची निश्चितच नसते, ती लढाई दोन पक्षातील, त्यांच्या तत्त्वांविरूद्धची असते. मात्र दोन राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते मतदारांपुढे जातात तेव्हा एकमेकांच्या पक्षांचे उणेदुणे बाहेर काढायला समोरचा प्रतिस्पर्धी मागेपुढे पाहात नाही.
असे असताना प्रतिष्ठेच्या या लढाईत ज्या उमेदवाराने आपल्या कन्येला किंवा आपल्या पत्नीला पराभवाची धूळ चाखली त्या उमेदवाराला सत्तेसाठी ‘आपले’ म्हणवून घेताना त्या नेत्यांचे अंत:करण खरंच परवानगी देते का, याबाबत शंका आल्याशिवाय राहात नाही. ज्या रामरतनबापूंच्या घरात काँग्रेसच्या तत्वांची परंपरा आतापर्यंत जपण्यात आली, ज्या बापूंना सात महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाकडून पराभवाला तोंड द्यावे लागले त्याच पक्षासोबत हातमिळवणी करताना काहीच वाटले नसेल का?
पंचायत समितीत असो किंवा जिल्हा परिषदेत असो, काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपशी घरोबा करावा यासाठी रामरतनबापूंनी स्वमर्जीने आपली ‘नाहरकत’ दिली असेल यावर विश्वास बसत नाही. कधीकधी एखादी लाट आली की त्यात अनेक गोष्टी वहावत जातात. पण रामरतनबापूंसारख्या मुरब्बी नेत्यानेही यात वहावत जावे, ही गोष्टी निश्चितच सर्वांना खटकणारी अशी आहे.
या घडामोडींवर शेवटी एकच विचारावेसे वाटते, ‘बापू, तुम्हीच खरं सांगा, या घडामोडी तुमच्या मर्जीने झाल्या का?.. भाजपशी केलेला घरोबा तुम्हाला मान्य आहे का?’