उमेदवारांकडून आश्वासनाची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:20+5:302021-01-13T05:16:20+5:30
गोरेगाव : नाली, सिमेंट, रस्ता घरी नळ कनेक्शन, विद्युत पोल देण्यात येईल, बीपीए रेशनकार्ड तयार करून दिले जातील, परिसराचा ...

उमेदवारांकडून आश्वासनाची खैरात
गोरेगाव : नाली, सिमेंट, रस्ता घरी नळ कनेक्शन, विद्युत पोल देण्यात येईल, बीपीए रेशनकार्ड तयार करून दिले जातील, परिसराचा विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. अशा एकापेक्षा एक लेखी घोषणा, जाहीरनाम्यातून देत मतदारांपुढे घालीन लोटांगण घालण्यासारखे प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दिसून येत आहेत.
गोरेगाव तालुक्यात २५ गट ग्रामपंचायतमध्ये १८७ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यात तेढा, चोपा, गिदाडी, तुमसर, चिल्हाटी, हिराटोला, कालीमाटी, मसगाव, घोटी, हिरापूर, आसलपानी, मलपुरी, पाथरी, बोरगाव, कवलेवाडा, सोनी, तेलनखेडी, खाडीपार, चिचगाव, मेघाटोला, शहारवानी, सोनेगाव, गोंदेखारी, तिल्ली यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ४१४ उमेदवार रिंगणात आहेत. ३५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रचाराचा ताेफा १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहे. त्यामुळे मतदारांच्या दारात घोषणापत्रे पोहोचविली जात आहेत. प्रचाराला चिन्ह वाटपानंतर सुरुवात झाली आहे. प्रभागांप्रमाणे उमेदवारांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या संग्रामात प्रत्येक उमेदवाराचे गट नव्या शकलीने मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण पाच वर्षांत ग्रामपंचायतीची कोणती कामे केली, शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना गावात राबविल्या, तसेच कोणत्या योजनेचे लाभ दिले, याचा उल्लेख सत्ताधारी गटाच्या जाहीरनाम्यात दिसत आहे. मागील पाच वर्षांत गावाच्या विकासापेक्षा सत्ताधारी गटाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आपला गट या वेळी निवडून आल्यानंतर गावाचा संपूर्ण विकास करेल, असा दावा दुसऱ्या गटाकडून केला जात आहे.
बॉॅक्स
जुन्या नात्यांना मिळतोय उजाळा
ग्रामपंचायत निवडणुकीत एका-एका मताला महत्त्व असल्याने जुन्या नातेसंबंधांना अधिक उजाळा मिळत आहे. एखाद्या मतदाराच्या घराच्या कार्यक्रमात आपण कधी सहभागी झाले होतो, त्याच्या दु:खात आपला सहभाग होता, त्या आठवणींना नातेवाईक तसेच मित्र परिवारासमोर उजाळा दिला जात आहे.
ढाबे, हॉटेल हाऊसफुल्ल
एखादे मत आपल्या गटाला मिळत नसल्यास ते दुसऱ्या गटाला मिळू नये, यासाठी जुगाड टेक्नॉलाॅजी वापरली जात आहे. तिसऱ्या गटाकडे ते मत कसे वळविता येईल यावर हॉटेल आणि ढाब्यावर अनेक चर्चा रंगत आहेत.