गोंदियात २५ लाखांचे दागिने असलेली बॅग पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 16:45 IST2020-11-05T16:45:29+5:302020-11-05T16:45:49+5:30
Gondia News Crime गोंदिया शहरातील गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविली.

गोंदियात २५ लाखांचे दागिने असलेली बॅग पळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविली. ही घटना गुरुवारी(दि.५) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश नगर येथे संजय सोनी यांच्या मालकीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते आज सकाळी दुकानात सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवून दुकानात पोहचले. दुकान उघडल्यानंतर त्यांनी काऊंटरवर सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवली. दरम्यान ते पूजा करीत असताना एका तरुणाने त्यांच्या दुकानात प्रवेश करुन दागिने असलेली बॅग उचलून पळ काढला. तो दुकानातून रस्त्य्यावर येताच दुसरा आरोपी मोटारसायकल घेवून दुकानसमोर आला. यानंतर ते दोघेही युवक मोटारसायकलवरुन पसार झाले. या घटनेच्या तपासासाठी शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची चमू कामाला लागली आहे. आभूषण ज्वेलर्सचे मालक संजय दुर्गाप्रसाद सोनी रा. गौशाला वार्ड यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांनो घ्या काळजी
शहरात मागील काही दिवसांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्या दिवाळीच्या खरेदी निमित्त बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. याच संधीचा नेमका फायदा चोरटे घेत आहे. गर्दीची ठिकाणे गाठून मौल्यवान वस्तू व पैसे चाेरुन नेत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना काळजी घेण्याची गरज आहे.